काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारच्या ‘हम दो हमारे दो’ धोरणावरून टीका केली होती. “हम दो, हमारे दो’चे हे सरकार आहे”, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’च्या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे.

“हम दो, हमारे दो” च्या घोषणेचा वापर पूर्वी कुटुंब नियोजनासाठी केला जात होता. जर त्यांना (राहुल गांधींना) या घोषणेचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आधी लग्न करायला हवं…आणि लग्न करायचं असेल तर त्यांनी दलित मुलीशी करावं आणि महात्मा गांधींचं जातीयवाद हटवण्याचं स्वप्न पूर्ण करावं. त्यांच्या या कृतीतून तरुणांना प्रेरणा मिळेल”, असं रामदास आठवले म्हणालेत.

आणखी वाचा- Video : ‘हम दो, हमारे दो’वाल्यांनो नीट ऐका; राहुल गांधींचा आसाममधून मोदी सरकारला इशारा


पुढे बोलताना रामदास आठवले यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन यांना देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचे आवाहनही केले.

आणखी वाचा- मुलगी आणि जावयाची काळजी आम्ही करायची; ‘हम दो, हमारे दो’ला अर्थमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर

काय म्हणाले होते राहुल गांधी?
संसदेत ११ फेब्रुवारी रोजी भाषण करताना ‘एकेकाळी हम दो, हमारे दो ‘चा नारा दिला जायचा, असं म्हणत राहुल गांधींनी “हा देश फक्त चार जण चालवत आहेत. म्हणजेच ‘हम दो, हमारे दो’ हे सरकार चालवत आहेत. त्यांची नावं घेणार नाही. पण ते लोक कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे”, अशी टीका केली होती.