राहुल गांधींची मोदींकडे मागणी; दोन महिने अगोदर २५ लाखांहून अधिक रक्कम भरणाऱ्यांची नावे उघड करण्याचीही मागणी

नोटाबंदी निर्णयाच्या दोन महिने आधी २५ लाखांपेक्षा अधिक रक्कम बँकांमध्ये भरणाऱ्या व्यक्तींची नावे उघड करण्याची मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केली. तसेच आतापर्यंत उघड झालेल्या काळ्या पशांचा हिशेब देण्याबरोबरच श्व्ोतपत्रिका काढण्याचीही मागणी त्यांनी केली.

काँग्रेसच्या वर्धापना दिनानिमित्त ‘२४, अकबर रोड’वरील मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमानंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ए.के. अँटनी, मोतीलाल व्होरा, मल्लिकार्जुन खरगे, जनार्दन द्विवेदी आणि रणदीप सुर्जेवाला आदी उपस्थित होते. राहुल यांनी यावेळी आपल्या मागण्यांची जंत्रीच प्रसिद्ध केली. त्यात दारिद्रय़रेषेखालील महिलांच्या बँक खात्यात २५ हजार रुपये भरण्याबरोबरच विक्री कर व प्राप्तिकरामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा समावेश आहे.

देशातील ५० कुटुंबांच्या फायद्यासाठी मोदींनी नोटाबंदीचा महायज्ञ केला आहे. पण त्यामध्ये आहुती गोरगरीब, शेतकरी-दलितांची दिली जात असल्याची प्रखर टीका सुरुवातीलाच करून ते म्हणाले, ‘पंतप्रधानांना माझे चार मुख्य प्रश्न आहेत. ८ नोव्हेंबरनंतर किती काळा पसा उघड झाला? या निर्णयाने अर्थव्यवस्थेला फटका बसून किती रोजगार हातातून हिसकावले गेले? रांगांमध्ये उभे राहून किती जणांचे आतापर्यंत बळी गेले? बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देणार की नाही? आणि सर्वात महत्त्वाचे, कोणत्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने नोटाबंदीचा निर्णय घेतला? हे सर्व प्रश्न देशवासीयांच्या मनात आहेत. मोदींना त्याची उत्तरे द्यावी लागतील.’

पसे जनतेचे आहेत. बँकेचे नाहीत आणि सरकारचे मुळीच नाहीत. तरीही नोटाबंदीचा निर्णय लादून तुम्ही जनतेचे आíथक स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप करून ते म्हणाले, ‘स्विस बँकांमधील खातेदारांची नावे उघड करण्याच्या बाता तुम्ही मारल्या होत्या. पण त्या यादीची अजूनही लोकसभा व राज्यसभा वाट पाहते आहे. चोर कोण आहेत? आणि त्यांना तुम्ही का वाचवीत आहात? याची उत्तरे आम्हाला हवी आहेत.’

पत्रकार परिषदेपूर्वी सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत राहुल यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. त्यानंतर त्यांचे छोटेखानी भाषणदेखील झाले. काँग्रेसची सोपी सुटसुटीत व्याख्या करण्याचा प्रयत्न करताना ते म्हणाले, ‘काँग्रेस म्हणजे दुसऱ्याची स्वीकारार्हता. दुसऱ्याला समजून घेणे. मी म्हणतो तेच खरे, असे नव्हे. काँग्रेस म्हणजे जनतेशी जोडलेली नाळ. जनतेच्या व्यथांना आणि भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे काँग्रेस. ब्रिटिशांच्या काळात आपण स्वातंत्र्यासाठी झगडलो. आता मोदींच्या राजवटीत भीती आणि दहशतीचा मुकाबला करू.’ या कार्यक्रमास माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

राहुल यांच्या मागण्या..

  • शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. मागील दोन महिन्यांत झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून किमान हमी भावांमध्ये २० टक्क्यांचा बोनस द्या.
  • दारिद्रय़रेषेखालील महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी २५ हजार रुपये भरा.
  • छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांना विक्रीकर आणि प्राप्तिकरामधून ५० टक्क्यांची सवलत द्या.
  • मनरेगाच्या कामांचे दिवस आणि दैनंदिन पगार दुप्पट करा.
  • बँकांमधून फक्त २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा रद्द करा.
  • नोटाबंदीच्या परिणामांवर श्व्ोतपत्रिका काढा.