देशातील वाढत्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या लॉकडाउनवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी टीका केली आहे. “वेडपणा इतका की तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करायची आणि वेगळ्या निकालाची अपेक्षा करत आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी सरकारनं लागू केलेल्या चारही लॉकडाउनचे आलेखही ट्विट केले आहेत.

करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या लॉकडाउनच्या काळात करोनाच्या टेस्ट वाढवण्यात याव्यात अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. त्याचबरोबर जास्तीत जास्त टेस्टिंग करणं महत्त्वाचं आहे. लॉडडाउननं करोना थांबवता येणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली होती. सध्या केंद्र सरकारनं लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली असून, देशातील करोना बाधितांची संख्या वेगानं वाढू लागली आहे. वाढणाऱ्या संख्येवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- “नोटबंदीच्या संकटाचा विक्रम लॉकडाउननं मोडला; देशाला उपचार हवेत, प्रचार नको”

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. यात राहुल यांनी चार लॉकडाउनविषयीचे आलेख ट्विट केलं आहे. त्याचबरोबर “वेडेपणा इतका की, तिच तिच गोष्ट सारखी करतायेत आणि वेगळ्या निकालाची अपेक्षा ठेवतात -अज्ञात” असं वाक्य पोस्ट करत राहुल गांधी यांनी सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावर टीका केली आहे.

आणखी वाचा- “मोदीजी, गाडीला चार चाकं असतात अन्…”; कपिल सिब्बल यांचा पंतप्रधानांना टोला

काही दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी आलेख शेअर करून सरकारला लक्ष्य केलं होतं. राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख ट्विट केला होता. या राष्ट्रांमध्ये संख्या वाढत असताना लॉकडाउन लागू करण्यात आला. मात्र, लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संख्या कमी होताना दिसत असल्याचं आलेखामधून दिसत होतं. भारतात रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाउन हटवण्यात आला आहे. असं या आलेखातून राहुल गांधी यांनी लक्ष वेधलं होतं. या आलेखांबरोबर राहुल गांधी यांनी “हे अपयशी झालेल्या लॉकडाउनसारखं दिसत आहे,” असं म्हटलं होतं.