गुजरातच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा मुद्दा बाजूला ठेवला असून, ते केवळ स्वत:बद्दलच बोलत आहेत, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांनी रविवारी दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात केली.

भाजपने नर्मदेच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित करून प्रचार सुरू केला. मात्र पाणीच मिळत नसल्याचे जनतेने सांगताच भाजपने घूमजाव केले. नंतर इतर मागासवर्गीयांचा विषय पुढे आणला. मात्र ओबीसींनी भाजपने आमच्यासाठी काय केले असा प्रश्न विचारला. त्यानंतर मग भाजपने दुसरा मुद्दा पुढे केला. शनिवारी पंतप्रधानांचे भाषण जेव्हा ऐकले तेव्हा ९० टक्के ते स्वत:बाबतचे बोलले. सतत त्यांची भूमिका बदलत आहे असा टोला राहुल यांनी लगावला. ही निवडणूक कोणत्या व्यक्तीशी संबंधित नाही तर ती गुजरातच्या भवितव्याशी निगडित आहे. राज्यातील भ्रष्टाचार किंवा भविष्यातील योजनांबाबत पंतप्रधान चकार शब्दही काढत नसल्याची टीका राहुल यांनी केली. पटेल, दलित समाज किंवा अंगणवाडी सेविकांनी जी आंदोलने केली त्याबाबतही पंतप्रधानांनी काहीच भाष्य केले नसल्याबद्दल राहुल यांनी आश्चर्य व्यक्त केले. पंतप्रधानांबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्यात भाजपचा पराभव निश्चित असल्याचे भाकीतही वर्तवले.