20 September 2020

News Flash

दिल्लीत सुरु आहे ‘चौकीदार ही चोर’ हा क्राइम थ्रिलर : राहुल गांधी

गुजरातवरुन आणलेला साथीदार कोट्यवधी रुपयांची वसूली करत आहे. अधिकारी थकले आहेत, विश्वासाला तडा गेला आहे आणि लोकशाही रडत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष संचालक राकेश अस्थाना यांची चौकशी करण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी आडकाठी आणल्याचे समोर आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. दिल्लीत सध्या ‘चौकीदार ही चोर’ हा क्राइम थ्रिलर सुरु असून अधिकारी थकलेत, विश्वासाला तडा गेला आहे आणि लोकशाही रडत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

राकेश अस्थाना यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करणारे उपमहासंचालक मनीषकुमार सिन्हा यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी अस्थाना यांची चौकशी करण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी आडकाठी आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केले. राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, दिल्लीत सध्या चौकीदार ही चोर हा क्राइम थ्रिलर सुरु आहे. नवीन भागात सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एक मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि केंद्रीय सचिवांवर गंभीर केले आहेत. दुसरीकडे त्याने गुजरातवरुन आणलेला साथीदार कोट्यवधी रुपयांची वसूली करत आहे. अधिकारी थकले आहेत, विश्वासाला तडा गेला आहे आणि लोकशाही रडत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

याचिकेतील गंभीर आरोप
> मांस निर्यातदार मोईन कुरेशी यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणारे अधिकारी देवेंद्र कुमार यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला होता. मात्र, अजित डोवल यांनी हस्तेक्षप केल्यामुळे छापासत्र थांबवण्यात आले.

> कुरेशी प्रकरणात अस्थाना यांच्याविरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला होता, मात्र अटक टाळण्यासाठी अस्थाना यांनी डोवल यांची मदत घेतली.

> याच प्रकरणातील मध्यस्थ मनोज प्रसाद याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. प्रसाद याने आपला डोवल यांच्याशी संपर्क असल्याचा दावा करत सिन्हा यांनाच धमकी दिली. मनोज याचे वडील दिनेश्वर प्रसाद हे गुप्तचर संस्था ‘रॉ’चे निवृत्त संयुक्त सचिव होते. त्यांची डोवल यांच्याशी जवळीक आहे. उच्चपदस्थ डोवल यांच्याशी संबंध असतानाही अटक कशी करण्यात आली याचा राग मनोजला आला होता.

> अस्थाना लाचखोरी प्रकरणातील प्रमुख तक्रारदार सतीश साना याने केंद्रीय कोळसा व खाण मंत्री हरिभाई चौधरी यांना काही कोटी रुपयांची लाच दिली आहे. तशी कबुलीही सानाने दिलेली आहे. त्याची माहिती लगेचच संचालक अलोक वर्मा यांना देण्यात आली.

> संचालक अलोक वर्मा यांची केंद्रीय दक्षता समितीने चौकशी केली. त्यासंदर्भात केंद्रीय विधि सचिव सुरेश चंद्रा यांनीही आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी रेखा राणी यांच्यामार्फत सानाशी संपर्क साधला होता. कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांचा ‘संदेश’ चंद्रा यांच्यामार्फत साना याला दिला गेला. साना याला संरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले. केंद्रीय दक्षता समितीने वर्मा यांच्या चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतरही रेखा राणी यांनी सानाशी संपर्क साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 10:08 am

Web Title: rahul gandhi slams modi government over cbi officer plea in supreme court accusing nsa minister
Next Stories
1 10 कापलेले हात सापडल्याने ओडिशात खळबळ
2 सामान्यांच्या खिशाला झळ ! टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार?
3 जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये चमकतीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद
Just Now!
X