केंद्र सरकारची भूमिका तटवर्ती क्षेत्रातील राज्यांमधील मच्छीमारांच्या हिताविरुद्धची असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. सुटाबुटातील सरकार मच्छीमारांना मच्छीमारी करण्यास मज्जाव करीत आहे, मात्र त्याच वेळी परदेशी नौकांना मच्छीमारीची परवानगी दिली जात आहे, असे गांधी म्हणाले. सरकारने मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे.
सरकारने मच्छीमारी करण्यावर घातलेली बंदी उठवावी आणि मच्छीमारीला परवानगी द्यावी, अशी मागणी गांधी यांनी केली. मोदी सरकार दुर्बलांच्या हिताला बाधा आणत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा इन्कार केला. मच्छीमारी करण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही आणि परदेशी नौकांना सरकारने परवानगी दिलेली नाही, असेही गडकरी म्हणाले.