सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता दोन दिवसांतच तयार होऊ शकतो या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा आता देशभरातून निषेध होताना दिसतोय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भागवतांचे हे वक्तव्य प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारे असून यामुळे सीमेवर शहीद होणाऱ्या जवानाचा अनादर झाल्याचे ते म्हणाले. शहीदांचा आणि सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या भागवतांची आपल्याला लाज वाटते, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. दरम्यान, भागवतांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे संघाकडून स्पष्टीकरण करण्यात आल्याचे माध्यमांत वृत्त येत आहे.

लष्कराला तयारीसाठी ६-७ महिने लागतील, आम्हाला दोनच दिवस : मोहन भागवत

बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या मोहन भागवतांनी रविवारी मुझफ्फरपूर येथे कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना हे वक्तव्य केले होते. भागवतांच्या या वक्तव्याचे पडसाद लगेचच देशभर उमटण्यास सुरूवात झाली. सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. राहुल गांधी यांनी ट्विट करत भागवतांवर तोंडसुख घेतले. संघप्रमुखांनी भारतीय नागरिकांचा व सीमेवर लढणाऱ्या जवानांचा अपमान केला आहे. हा तिरंग्याचाही अपमान आहे, कारण प्रत्येक जवान हा तिरंग्याला सलाम करतो. शहीद जवानांचा आणि भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या भागवतांची मला लाज वाटते, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही भागवतांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. तर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनीही भागवत व भाजपावर टीका केली. इतर पक्षाच्या नेत्यांनी जर असे वक्तव्य केले असते तर माध्यमांनी त्यांना देशद्रोही ठरवले असते. त्यांचे वक्तव्य सैन्यदलाच्या कार्यक्षमतेवर नाही का, हा सैन्यदलाचा अपमान नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.

काय म्हणाले होते मोहन भागवत..
आपण लष्कर नाही मात्र आपली शिस्त लष्कराप्रमाणेच आहे. आपले स्वयंसेवक लष्कराच्या आधी तयार होऊ शकतात. देशाला जर आमची गरज पडल्यास तसेच संविधानाने आणि कायद्याने आम्हाला परवानगी दिली. तर आम्ही तात्काळ शत्रूशी लढण्यास तयार आहोत. सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, आपण दोन दिवसांतच तयार होऊ शकतो, कारण आमची शिस्तच तशी आहे. आमची संघटना ही लष्करी किंवा निमलष्करी संघटना नाही. मात्र, ती एक कौटुंबिक संघटना असल्याचेही ते यावेळी म्हणाले.