करोना व लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून, सेवा क्षेत्रासह अनेक उद्योग संकटात आले आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आर्थिक त्सुनामी येणार हे काही महिन्यांपूर्वीच मी म्हणालो होतो. पण, देशाला सत्य परिस्थिती विषयी इशारा दिला म्हणून भाजपा व माध्यमांनी माझी थट्टा केली होती,” अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यासंबंधी राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. “लघु व मध्यम उद्योग नष्ट झाले आहेत. मोठंमोठ्या कंपन्या प्रचंड तणावाखाली आहेत. बँकाही संकटात आहेत. मी काही महिन्यांपूर्वी आर्थिक त्सुनामी येणार असं म्हणालो होतो. देशाला सत्य परिस्थितीविषयी इशारा दिला होता. पण, त्यावरून भाजपा आणि माध्यमांनी माझी थट्टा केली होती,” असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला फटकारलं आहे.

आणखी वाचा- धोक्याचा इशारा: भारतात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार करोना रूग्ण

करोनामुळे १ लाख ६७ हजार कोटींचा बोजा वाढणार

करोनामुळे आलेलं संकट आणि त्यानंतरच्या धोरणांमुळे ५०० बड्या कर्जदार कंपन्यांवर आणखी १ लाख ६७ हजार कोटी रुपयांचा बोजा वाढू शकतो. त्यामुळे या आणि पुढील वित्त वर्षात हे खासगी कर्जदार परतफेड करण्यात कूचराई करतील, असे पतमानांकन संस्थेचं म्हणणं आहे. यापेक्षाही कठीण परिस्थिती आलीच तर कर्जाच्या अतिरिक्त बोजा आणखी १.६८ लाख कोटींनी वाढू शकतो, अशी शक्यताही संस्थेनं वर्तवली आहे. याच माहितीचा हवाला देत राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.