काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील माणुसकीचे नुकतेच दर्शन घडले. दिल्लीतील हुमायून रोडवर दुचाकीचा अपघात होऊन जखमी झालेल्या एका पत्रकाराला त्यांनी मदत केली. दरम्यान, तिथून जाणाऱ्या राहुल गांधी यांनी आपला ताफा रस्त्यात थांबवला आणि त्या जखमी पत्रकाराला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअम येथे ओबीसी परिषदेला संबोधित करण्यासाठी राहुल गांधी हुमायुन मार्गावरुन निघाले होते. त्यावेळी स्थानिक पत्रकार राजींदर व्यास हे त्यांना रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत दिसले. ते दुचाकी घसरल्याने जखमी अवस्थेत खाली पडले होते. या जखमी पत्रकाराला राहुल गांधींनी आपल्या कारमध्ये घेतले आणि एम्समध्ये उपचारांसाठी दाखल केले, प्रत्यक्षदर्शीनी ही माहिती दिल्याचे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

यापूर्वीही राहुल गांधींनी अनेकदा अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात ओडिशातील भुवनेश्वरमध्ये कार्यक्रमस्थळी जात असताना राहुल गांधींचे फोटो घेताना एक वृत्तछायाचित्रकार चुकून एका कठड्यावरुन कोलांटी उडी घेत खाली पडला. हे समोर पाहिल्यानंतर राहुल गांधींनी त्याच्याकडे धाव घेत त्याला सावरले आणि त्याची वाचारपूस केली होती.

तर केरळमध्ये गेल्या वर्षी तुफान पावसामुळे आलेल्या पूरस्थितीचा आढावा घेऊन आपल्या खासगी हेलिकॉप्टरने निघाले होते. दरम्यान, तिथे जखमींना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरही उड्डाणाच्या तयारीत होते. त्यावेळी राहुल गांधींनी प्रथम त्या हेलिकॉप्टरला जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला होता. या घटनेनंतरही राहुल गांधी चर्चेत आले होते.