काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेली चौकीदार चोर है ही घोषणा त्यांच्या अंगलट आली आहे. कारण आता याच घोषणेप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याचा ठपका ठेवत राहुल गांधींविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधी यांच्याविरोधात समन्स जारी केले आहे. ३ ऑक्टोबर रोजी राहुल गांधी यांनी कोर्टापुढे हजर रहावे असेही निर्देश दिले आहेत.

राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी भ्रष्टाचार झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे पैसे अनिल अंबानी यांना दिले असा आरोप केला होता. हा आरोप करताना त्यांनी चौकीदार चोर है, चोरोका सरदार असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काढले होते. राहुल गांधी यांनी अशी वक्तव्यं केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाल्याचं भाजपा कार्यकर्ते महेश श्रीश्रीमाळ यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी या ठिकाणी जे दौरे केले तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख आला की ते चौकीदार चोर है ही घोषणा देत होते. हाच संदर्भ देऊन अब्रू नुकसानीचा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याच संदर्भात राहुल गांधी यांनी ३ ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर रहावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

तक्रारदार भाजपाचे सदस्य आहेत त्यामुळे अशा प्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे असेही कोर्टाने म्हटले आहे. २० सप्टेंबर २०१८ रोजी जयपूरच्या सभेत गली गली में शोर हे हिंदुस्थान का चौकीदार चोर है असा नारा दिला होता. तर २४ सप्टेंबर रोजी ट्विट करुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून काही अपमानकारक वक्तव्यं केली होती. या सगळ्यामुळे पंतप्रधान आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.