काँग्रेसमध्ये राहुलपर्वाला शनिवारी सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी अध्यक्षपदी विराजमान झाले. मनमोहन सिंग यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या असून या घोषणेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला.

राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा काँग्रेसने सोमवारी केली होती. शनिवारी राहुल गांधी यांचा पक्षाभिषेक सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे नेते दिल्लीत पोहोचले. दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचीही गर्दी झाली होती. फटाके फोडून आणि मिठाई वाटून कार्यकर्ते जल्लोष करत होते. या प्रसंगी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

सकाळी अकराच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत त्यांना अध्यक्षपदी निवड झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. यानंतर मनमोहन सिंग यांनी संबोधित केले. राहुल गांधी यांना शुभेच्छा देतानाच मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांचे देखील आभार मानले. गेल्या १९ वर्षांपासून पक्षाच्या अध्यक्षपदाची धूरा समर्थपणे सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांना मी वंदन करतो, असे ते म्हणालेत.

सोनिया गांधी यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष या नात्याने माझे हे शेवटचे भाषण असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या संवैधानिक मूल्यांवर हल्ला होत आहे. देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले असून देशाच्या मूल्यांचे रक्षण करणे हेच तुमचे ध्येय आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. २०१४ पासून आपण विरोधी पक्षात आहोत, पण आपण घाबरणारे आणि झुकणारे नाहीत, असे त्यांनी नमूद केले. राहुल हा माझा मुलगा असल्याने मी त्याच्याविषयी फार बोलणार नाही. लहानपणापासूनच त्याने हिंसेचा सामना केला. राजकारणात आल्यावर त्याच्यावरील हल्ले आणखी तीव्र झाले पण यातून तो निडर आणि मानसिकदृष्ट्या आणखी कणखर झाला, असे त्यांनी सांगितले.

 

इंदिरा गांधी आणि त्यांच्या पाठोपाठ राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. माझा आधारच हिरावून घेतला होता, इंदिरा गांधी या माझ्यासाठी आईसमानच होत्या, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. माझ्या या प्रवासात काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते माझे सहप्रवासी होते आणि मार्गदर्शकही होते, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भाजपवर टीकास्त्र सोडले. आज भाजपचे लोक संपूर्ण देशात आग आणि हिंसा पसरवत आहे, भाजप देश तोडण्याचा प्रयत्न करत असून काँग्रेस सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.