काळ्या पैशावरून राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या ठरावातील चर्चेत सहभागी होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्ला चढविला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला छोटय़ा पिंजऱ्यात कोंडण्यात आले होते, मात्र लाहोरला अचानक भेट देऊन मोदी यांनी पाकिस्ताची त्या पिंजऱ्यातून सुटका केली. इतकेच नव्हे तर काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोदी यांनी अर्थसंकल्पाद्वारे ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ योजना आणल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.
जेएनयूच्या प्रश्नावरून विशेषत: न्यायालयाच्या संकुलात पत्रकार, शिक्षक यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत मोदी यांनी पाळलेल्या मौनावरही राहुल गांधी बरसले. मोदी यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कडवट शब्दांत टीका करताना राहुल गांधी यांनी, मोदी कोणाचेही मत विचारात घेत नसल्याचे सांगितले. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री, पक्षाचे खासदार यांचेही मत ते विचारात घेत नाहीत. तिकेच नव्हे तर पाकिस्तानचा दौरा आणि नागा करार याबाबतही त्यांनी कोणाचेही मत जाणून घेतले नाही, असेही गांधी म्हणाले.
विरोधकांशी संपर्क साधण्याचे आवाहन मोदी यांना करताना राहुल गांधी म्हणाले की, सरकार हे आमचे शत्रू आहे, असा विरोधी पक्षांचा समज नाही, आम्ही तुमचा तिरस्कारही करीत नाही. राहुल गांधी यांच्या भाषणांत भाजपच्या सदस्यांकडून सातत्याने अडथळे आणले जात होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर यूपीएने पाकिस्तानला एका छोटय़ा पिंजऱ्यात कोंडले होते, मात्र मोदी यांनी पाकिस्तानला भेट देऊन मोदी यांनी एकहाती ही मेहनत वाया घालविली, असा आरोप गांधी यांनी केला.
यूपीए सरकारने हजारो तास मेहनत करून आणि सविस्तर चर्चा करून पाकिस्तानला छोटय़ा पिंजऱ्यात कोंडले होते त्या पिंजऱ्यातून मोदी यांनी पाकिस्तानची सुटका केली. यूपीएने केलेल्या कामगिरीचा आम्हाला अभिमान होता. आम्ही पंचायत निवडणुका घेतल्या, स्वयंसाहाय्य गट निर्माण केले, त्यामुळे रोजगारनिर्मिती झाली, काश्मीरमधील घुसखोरीचा आम्ही कणा मोडला, असेही गांधी म्हणाले.
या सर्व पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी काय केले, तर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासमवेत कोणताही द्रष्टेपणा न ठेवताच चहापान घेण्याचे ठरविले, परतीच्या वाटेतच त्यांनी पाकिस्तान दौऱ्याकडे वाट वाकडी केली. नागा कराराप्रमाणेच त्यांनी कोणाशीही या बाबत चर्चा करण्याची तसदी घेतली नाही. गुप्तचर यंत्रणांशीही नाही आणि राजनैतिक अधिकाऱ्यांशीही नाही, असे गांधी म्हणाले. कदाचित त्यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही चर्चा केली नसेल, केवळ आपल्या मनाप्रमाणेच ते वागले आणि त्यांनी यूपीएची सहा वर्षांची मेहनत एकहाती नष्ट केली, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल उवाच..
* सरकार हे आमचे शत्रू आहे, असा विरोधी पक्षांचा समज नाही.
* आम्ही तुमचा तिरस्कारही करीत नाही.
* देशातील काळा पैसा पांढरा करण्यासाठी केंद्राची फेअर अ‍ॅण्ड लव्हली योजना.
* मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर यूपीएने पाकिस्तानला कोंडीत पकडले होते, मात्र मोदी यांनी एकहाती ही मेहनत वाया घालविली.
* जेएनयू, रोहित वेमुला प्रकरणी पंतप्रधान गप्प का?