काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेतील भाषणादरम्यान सततच्या परदेशवारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. पंतप्रधान परदेशातून काही दिवसांसाठी देशामध्ये आलेच आहेत तर त्यांनी पंजाबमध्ये जाऊन यावे. तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर कदाचित पंतप्रधानांना शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात येईल, असा सल्ला राहुल गांधींनी दिला. अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. जेणेकरून त्यांनी नवे पीक घेता येणे शक्य होईल. या सगळ्यात सरकारचाच फायदा असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी राहुल यांनी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमालाही लक्ष्य केले. सरकार ‘मेक इन इंडिया’चा इतका गाजावाजा करते मग देशासाठी धान्य पिकवणारा शेतकरी ‘मेक इन इंडिया’ करत असल्याची गोष्ट त्यांच्या ध्यानात येत नाही का, असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांची महत्त्वाची अनुदाने बंद केली, तरी शेतकरी गप्प बसला. बोनस मिळत होता तो बंद केला, ते शेतकऱ्यांनी सहन केले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याऐवजी लाठ्या पडल्या, तेही शेतकऱ्यांनी सहन केले. आता बाजारातील गहू पडून आहे, त्याला उठाव नाही. जर अशी परिस्थिती असेल तर ‘तुमचे सरकार कोणासाठी आहे‘ असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित करताच भाजपच्या खासदारांनी ‘तुमचे नाही, आपले सरकार‘ असे ओरडायला सुरवात केली. त्यावर हजरजबाबीपणे प्रत्युत्तर देताना, ‘हो आमचे सरकार आहे, तुमचे सराकार आहे, मात्र, शेतकरी आणि कामगारांचे सरकार नसल्याचे राहुल गांधींनी सांगितले.