देशातील जनता त्रस्त असताना पंतप्रधान मोदी मात्र मस्त आहेत, असे भाष्य करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी बुधवारी उत्तरप्रदेशमधील किसान यात्रेत पंतप्रधानांवर निशाणा साधला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात किसान यात्रेने पक्षाच्या प्रचाराची मोर्चे बांधणी सुरु केली आहे.  राहुल यांच्या उत्तरप्रदेशमधील देवरियाच्या सभेनंतर लोक खाट घेऊन जाण्यासाठी तुटून पडल्याचे समोर आले होते. काहींनी संपूर्ण खाट आहे तशी नेली तर काहींनी त्याचे तुकडे करून नेली.  सभेमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर  शेतकऱ्यांनी खाट चोरी केल्याच्या चर्चेला उधाण आले. याप्रकरणी  प्रसारमाध्यमांशी बोलताना  राहुल गांधींनी शेरबाजी करत मोदी सरकारवर निशाणा साधला. गरीबांनी नेलेल्या वस्तूला आपल्याकडे चोरी ठरवतात, तर मल्ल्यासारख्या देशाला हजारो कोटीला गंडा घालणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे ‘डिफॉल्टर’ म्हणून दुर्लक्ष करतात, अशा भाषेत संताप व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या परदेशी दौऱ्यावर देखील राहुल गांधीनी यावेळी सवाल उपस्थित केले. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत अमेरिकेचे नव्हे असे भाष्य करत राहुल गांधीनी पंतप्रधानांर  निशाणा साधला. काँग्रेसचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार,  राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश राज्यात  किसान यात्रा सुरू केली आहे. राजीव गाधी महिला विकास योजनेच्या सदस्य सरस्वती यांनी खाट चोरीच्या  प्रकारावर प्रतिक्रिया दिली होती. देताना राहुल गांधी यांच्याकडून शेतकऱ्यांना खाट भेट देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.