आरोपांचा सामना करण्याची क्षमता पंतप्रधानांमध्ये नाही
ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून विरोधकांचे आरोप सहन करणाऱ्या केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अत्यंत आक्रमक शब्दांमध्ये काँग्रेसचा विशेषत गांधी परिवाराचा समाचार घेतला. अमेरिकेत  ३३ वर्षांपासून तुरुंगवासात असलेल्या आदील शहरयार या आपल्या ‘जिवलग’ मित्राला सोडविण्यासाठी राजीव गांधी यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसनला भारतातून पळून जाण्यास मदत केल्याचा गौप्यस्फोट करीत स्वराज यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया व राहुल गांधी यांना खडसावले. या आरोपाचे अद्याप एकाही काँग्रेस नेत्याने खंडन केलेले नाही.  माझ्यावर हितसंबंध जपल्याचा आरोप करण्यापूर्वी स्वतच्या घराण्याचा इतिहास जाणून घ्या. तेव्हा क्वात्रोचीला मदत करण्यासाठी किती पैसा मिळाला, असा प्रश्न आईला (सोनियांना) विचारा, अशा शब्दात स्वराज यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले.
राजीव गांधी यांनी अँडरसनला पळण्याची संधी कशी दिली याची सविस्तर कहाणीच स्वराज यांनी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देवून कथन केली. विरोधकांच्या प्रचंड गोंधळात स्वराज यांनी स्वतची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.  पती स्वराज कौशल यांचे ललित मोदींशी व्यावसायिक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
त्या म्हणाल्या की, पासपोर्ट मिळविण्यासाठी ललित मोदी यांची बाजू मांडणाऱ्या अकरा वकिलांमध्ये माझी मुलगी नवव्या क्रमांकावर होती. तिला त्या कामाचे पैसेही मिळाले नाहीत. ललित मोदींना मदत केल्याने विरोधकांनी स्वराज यांच्यावर सहा आरोप केले होते.ललित मोदी यांचा रद्द करण्यात आलेला पासपोर्ट परत देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला होता. त्याविरोधात केंद्राने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली नाही. केंद्र सरकारच्या या भुमिकेवर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय देताना तत्कालीन संपुआ सरकारने या प्रकरणी चार वर्षे वेळकाढूपणा केला होता, असे स्वराज यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसला आम्हाला विचारण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. ललित मोदींवर कारवाई करण्यावरून काँग्रेसमध्ये फूट पडली होती. एका बाजूला चिदंबरम तर दुसरीकडे उरलेले सर्व नेते होते. चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या एकाही पत्राची प्रत परराष्ट्र विभागाकडे धाडली नाही. त्यामुळे ललित मोदी प्रकरणी झालेला पत्राचार प्रसिद्ध करता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या. ललित मोदी यांना देशातील कोणत्याही न्यायालयाने पळपुटा घोषीत केलेले नाही, असे ठोस प्रतिपादन स्वराज यांनी केले. हितसंबंध मी जपले नसून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जपले आहेत. शारदा चीट फंड प्रकरणी चिदंबरम यांची पत्नी नलिनी यांना एक कोटी रूपये मिळाले होते, असा गौप्यस्फोट स्वराज यांनी केला.
स्वराज यांच्या भाषणादरम्यान व्यत्यय आणण्यासाठी काँग्रेस सदस्य घोषणा देत होते. तरीही स्वराज बोलत राहिल्या. त्यांच्या भाषणातील वाढता आवेश पाहून काँग्रेसच्या गौरव गोगई यांनी त्यांच्यासमोर जावून फलक धरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना भाजपच्या किरिट सोमय्या यांनी रोखून धरले.
काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वराज यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, ‘मानवतेच्या मुद्यांवर मदत करताना स्वराज यांनी ललित मोदींना परदेशातून भारतात परत येण्याची सूचना का केली नाही? याशिवाय ललित मोदींचा जप्त पासपोर्ट परत करण्याच्या उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सरकार का गेले नाही? स्वराज व ललित मोदी यांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत.’

माझ्यावर हितसंबंध जपल्याचा आरोप करण्यापूर्वी स्वतच्या घराण्याचा इतिहास जाणून घ्या. तेव्हा क्वात्रोचीला मदत करण्यासाठी किती पैसा मिळाला? पासपोर्ट मिळविण्यासाठी ललित मोदी यांची बाजू मांडणाऱ्या अकरा वकिलांमध्ये माझी मुलगी नवव्या क्रमांकावर होती. शारदा चीट फंड प्रकरणी चिदंबरम यांची पत्नी नलिनी यांना एक कोटी रूपये मिळाले होते.
सुषमा स्वराज</strong>

या आरोपांचा सामना करण्याची क्षमता पंतप्रधानांमध्ये नाही. त्यामुळे ते अनुपस्थित आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धा काळ्या पैशांचे केंद्र आहे. तर ललित मोदी या केंद्राचे प्रतीक! त्यांना स्वराज यांनी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी मदत केली. राहुल गांधी</strong>