राहुल गांधी यांची टीका

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला. मोदी यांना परदेश दौरे आणि आपल्या पेहरावातच अधिक स्वारस्य असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. अमेरिकेच्या दौऱ्यात मोदी यांना १६ वेगवेगळ्या पेहरावांत पाहिल्याचेही ते म्हणाले.
मोदी सरकारवर सूट-बूट की सरकार हा हल्ला पुन्हा एकदा चढविताना मोदी म्हणाले की, मोदी यांना शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या समस्यांची जाणीव नाही. मोदी हे २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि विविध कार्यक्रमांत मोदी यांना १६ वेगवेगळ्या पेहरावांत पाहिले, असे गांधी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच बहुरंगी पेहरावात दिसतात आणि त्यांच्याभोवती राजकीय आणि उद्योग क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील बडी मंडळी असतात. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे नेहमीच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात आणि समाजातील सर्व स्तरांमधील जनतेत सहजतेने मिसळतात, असेही राहुल गांधी म्हणाले.

मोदी नेहमीच जागतिक दौऱ्यावर जातात, परंतु मोदी हे एखाद्या शेतकऱ्याशी अथवा बेरोजगार युवकाशी चर्चा करीत असतानाचे दृश्य आपण कधीही पाहिले नाही. मोदी हे शेतकऱ्यांमध्ये अथवा फाटक्या कपडय़ातील कामगाराशी चर्चा करीत असतानाची छायाचित्रे तुम्ही कधी पाहिली आहेत का?
– राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष