सुप्रीम कोर्टाने अरूणाचल प्रदेशसंदर्भात दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांना लोकशाहीचा अर्थ समजावून सांगितल्याबद्दल राहुल गांधी यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. तर काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांनीही लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवणाऱ्यांचा हा पराभव असल्याचे म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने बुधवारी अरूणाचल प्रदेशमधील सत्ता ताबडतोब काँगेसच्या हाती द्या, असे आदेश केंद्र सरकारला दिले. त्यामुळे मोदींवर हुकुमशाहीचा आरोप करणाऱ्या विरोधकांना टीकेसाठी आयती संधी मिळाली आहे. विरोधक या संधीचा पुरेपर फायदा उठवताना दिसत आहेत. जनतेने निवडून दिलेल्या सरकारांच्या कारभारात हस्तक्षेप करू नये, हे मोदीजींना आता तरी कळेल. आधी उत्तराखंड आणि आता अरूणाचल प्रदेश अशा दोन्ही ठिकाणीची राष्ट्रपती राजवट रद्द करून न्यायालयानं मोदी सरकारला दोनदा चपराक लगावली आहे, त्यामुळे या प्रकरणातून धडा घेऊन मोदीजी आतातरी दिल्ली सरकारला त्यांच्या मार्गाने काम करू देतील अशी प्रतिक्रियाही केजरीवाल यांनी दिली आहे.