देशात सध्या करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचे संकट निर्माण झालेले आहे. दररोज आढळून येत असलेल्या करोनाबाधितांच्या मोठ्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, इंजेक्शन आदींचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून आले. तर, लस तुटवड्यामुळे लसीकरण मोहीमेस अनेक ठिकाणी स्थगिती द्यावी लागली.. या सर्व पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यानंतर आता, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“करोनाशी लढण्यासाठी पाहिजे – योग्य हेतू, धोरण, निश्चय. महिन्यातून एकदा निरर्थक बोलणं नाही.” अशा शब्दांमध्ये ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

तसेच, “पंतप्रधानांच्या खोट्या प्रतिमेसाठी कोणत्याही विभागाचा मंत्री कोणत्याही विषयावर काहीपण बोलण्यासाठी मजबूर आहे. देशाला सोबत घेऊन चला, विषाणूचा प्रादुर्भाव थांबवा, खोटं बोलणं बंद करा, लसीकरण मोठ्याप्रमाणात करा. केंद्र सरकारच्या प्राथमिकता – सोशल मीडिया, खोटी प्रतिमा, जनतेची प्राथमिकता – विक्रमी महागाई, करोना लस. हे कसले अच्छे दिन!” असं देखील या अगोदर राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटलेलं आहे.

तसेच, लसीकरणाबाबत योग्य नियोजन केलं गेलं नाही तर करोना महामारीच्या अनेक लाटा येतच राहातील, असा इशारा देखील राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिला होता.

Covid crisis : मोदींना अजूनही करोना समजलेला नाही; राहुल गांधींचा घणाघात

“अनेकदा सरकारला करोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. आणि जसं की तुम्ही पाहिलं मोदींनी करोनाविरुद्ध विजय घोषित केला. त्यांनी करोनाला हरवलं असल्याचं जाहीर केलं. मात्र अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही.” असं राहुल गांधी म्हणालेले आहेत.

पंतप्रधान मोदींची ‘ऑक्सिजन वॉरियर्स’सोबत ‘मन की बात’; म्हणाले…

देशात सगळीकडे ऑक्सिजन तुटवड्याची ओरड सुरू झाल्याने, सरकारने पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला असून, यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला. त्याचबरोबर देशातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केलं.