विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्यात येत असल्याची चर्चा सुरू असतानाच राहुल गांधी बिहारमध्ये नऊ जाहीर सभा घेणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चार सभाही बिहारमध्ये होणार आहेत. त्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी काँग्रेसने आक्रमक पाऊल उचलल्याचे राजकीय जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांच्या एकूण नऊ सभांपैकी दोन सभा अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीमांचल प्रदेशात होणार आहेत. या प्रदेशात असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने जद(यू), राजद आणि काँग्रेस महाआघाडीसमोर एक आव्हान उभे केले आहे. काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचाराला ३ ऑक्टोबरपासून भागलपूरमधून सुरुवात होणार आहे.
मंगळवारी आखण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सोनिया गांधी यांच्या चार सभा बिहारमध्ये होणार आहेत. मात्र राज्यातील नेत्यांच्या मागणीनुसार या नेत्यांच्या आणखीही सभा आयोजित होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी हे ७, २६ आणि ३० ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेणार असून दरदिवशी त्यांच्या तीन सभा होणार आहेत. ७ ऑक्टोबर रोजी बेगुसराई, शेखपुरा आणि कैमूर येथे, २६ ऑक्टोबर रोजी पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण आणि सीतामढी येथे आणि ३० ऑक्टोबर रोजी किशनगंज आणि कटिहार येथे ते सभा घेणार आहेत.