गुजरातमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेलं यश बघता काँग्रेसने हिंदुत्वाला गोंजारायचं ठरवलेलं दिसत आहे. कर्नाटक, राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून गुजरातप्रमाणेच या राज्यांमध्येही काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी मंदिरांना भेटी देणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजकीय पुनरुज्जीवनासाठी राहूल गांधींचे Temple Run धोरण सुरू राहील अशी शक्यता आहे.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटक, राजस्थान व मध्य प्रदेश या तीन राज्यांमधल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीला राज्यांमधल्या मंदिरांची यादी बनवण्यास सांगण्यात आले आहे. गुजरातमध्ये राहूल गांधींनी निवडणूक प्रचारादरम्यान १८ पेक्षा जास्त मंदिरांना भेट दिली होती. त्याचा त्यांना राजकीय फायदा झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या मंदिर भेटींवर टीका झाल्यानंतर तर, काँग्रेस प्रवक्त्यांनी राहूल हे जानवेधारी ब्राह्मण असल्याची मल्लिनाथी केली होती. काँग्रेसला जरी सत्ता मिळाली नाही तरी भाजपाच्या तोंडचे पाणी काँग्रेसने पळवले होते आणि यासाठी गुजरातमधलं राहूल गांधींचं Temple Run कामाला आल्याचं पक्षातील धुरीणांचं मत बनलं आहे.

त्यामुळे कर्नाटक, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांमध्येही काँग्रेसला अपेक्षित यश मिळावं यासाठी राहूल गांधी मंदिरांना भेटी देण्यास सज्ज होत असल्याचा कयास सूत्रांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळेच त्या त्या राज्यांमधल्या पदाधिकाऱ्यांना राज्यातल्या प्रमुख राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या देवस्थानांची व यादी बनवण्यास सांगण्यात आले आहे. तिनही राज्यांमध्ये भाजपा प्रमुख प्रतिस्पर्धी असून राजस्थान व मध्य प्रदेशात तर भाजपाचीच सत्ता आहे. भाजपाचा हिंदुत्ववाद आणि हिंदू मतांवरील पगडा लक्षात घेता राहूल गांधींचा Temple Run काँग्रेसपासून दूर गेलेल्या मतदारांना पुन्हा जोडेल असा विश्वास काँग्रेसच्या धुरीणांना वाटत आहे. काँग्रेस म्हणजे मुस्लीमांचे मतांसाठी लांगूलचालन करणारा पक्ष अशी प्रतिमा बदलून सॉफ्ट हिंदुत्ववादी अशी प्रतिमा निर्माण करण्याचा पक्षाच जाणीवपूर्वक प्रयत्न दिसून येत आहे.

अर्थात, काँग्रेस हिंदुत्वाकडे एकतर्फी झुकत नसून राहूल मशिदींनाही भेटी देतात असे सांगत काँग्रेस मुस्लीम व हिंदू अशा दोघांनाही चुचकारण्याची कसरत करत आहे. राहूल गांधींनी तर मी शिवभक्त असल्याचे सांगत मंदिरांच्या भेटी कशा योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केलाच होता. काँग्रेसने केलेल्या अंतर्गत पाहणीनुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुका तसेच उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला हिंदुत्ववादी धोरणाचा फायदा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. भाजपाची नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड वाढ होण्यामागे हिंदुत्ववाद असल्याचेही काँग्रेसच्या नेत्यांनी मनोमन मान्य केल्याचे जाणवत आहे. त्याच धर्तीवर गुजरातमध्ये Temple Run चा प्रयोग करण्यात आला आणि आता कर्नाटक, राजस्थान व मध्य प्रदेशमध्येही हाच प्रयोग करण्याची तयारी सुरू आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी काही राज्यांमध्ये तरी काँग्रेसला सत्ता मिळवणे आवश्यक आहे, तरच लोकसभेची निवडणूक जोमाने लढता येईल. त्यासाठी, जर राम व शिव या दोन नावांचा जप कामाला येत असेल तर तो करू नये असा सवाल एका काँग्रेसच्या धुरीणानं विचारला आहे. त्यामुळे पुढील वर्षी भाजपा आणि काँग्रेसचे नेते निवडणुकांच्या रणधुमाळीत भजन किर्तनात दंग झालेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको.