तब्बल आठ आठवडे अज्ञातवासात काढल्यानंतर शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तुघलक रोड येथील आपल्या निवासस्थानी पहिल्यांदाच जनतेला सामोरे गेले. भूसंपादन विधेयकासंदर्भातील कायद्यात केंद्र सरकारने सुचवलेल्या बदलांबाबत विविध राज्यांमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मते जाणून घेण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. याशिवाय, रविवारी नवी दिल्ली येथे काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘किसान खेत मजदूर’ मेळाव्याला राहुल गांधी संबोधित करणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून राहुल गांधी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याला मोठ्या संख्येने गर्दी जमावी आणि भव्य शक्तीप्रदर्शन करता यावे, यासाठी काँग्रेसच्या सर्व स्तरावरील नेते युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवांशी बातचीत केली असून, प्रत्येकाला या मोर्च्यासाठी लोकांना आणण्याचे विशिष्ट लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह यांच्यासोबत उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशातील विविध शेतकरी संघटनांच्या सदस्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या या प्रतिनिधीमंडळात भट्टा परसौल गावाचे शेतकरीही सहभागी होते. याच गावातून राहुल गांधी यांनी २०११मध्ये शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने अधिग्रहण केल्याविरोधात पदयात्रा सुरु केली होती.