मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणासह देशभरात अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावर उतरून शेतकरी आपला राग व्यक्त करत असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही शेतकरी आंदोलनात उडी घेतली आहे. राहुल गांधी पंजाब व हरयाणामध्ये ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली होती. ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ही विधेयकं राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती. तिन्ही विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर तिन्ही विधेयकांचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे.

आणखी वाचा- “कोणालाही घाबरणार नाही; कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही”

दुसरीकडे या तिन्ही कायद्यांबद्दलचा शेतकऱ्यांचा विरोध अजूनही मावळलेला नाही. पंजाब, हरयाणासह देशातील अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतला असून, ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान पंजाब व हरयाणामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहेत.

आणखी वाचा- जिओची सिम कार्ड जाळत, रिलायन्सच्या पेट्रोल पंपांवर बहिष्कार टाकत पंजाबमधील शेतकऱ्यांचं आंदोलन

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राहुल गांधी आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते या कायद्याबद्दल ट्विट करून टीका करत आहेत. “कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातोय. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा,” असं म्हणत राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत झालेल्या गदारोळाबद्दल ट्विट केलं होतं.

सध्या हरयाणातील आंदोलक शेतकरी दिल्लीच्या दिशेनं निघाले होते. हे शेतकरी दिल्लीतील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विजय घाटावरील समाधीस्थळी येणार होते. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखलं.