पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादाचे विष पसरवत असल्याचा जळजळीत आरोप गुरुवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांचा नामोल्लेख न करता केला. पं. जवाहरलाल नेहरू यांची स्वतंत्र भारत कल्पना उद्ध्वस्त करणाऱ्यांशी मुकाबला करा, अशी सूचनाही काँग्रेसने या वेळी पक्ष कार्यकर्त्यांना केली.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनिया आणि राहुल गांधी यांनी मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा अंगुलिनिर्देश त्यांच्याकडेच होता.
स्वच्छ भारत अभियान म्हणजे छायाचित्र छापून आणण्याची पर्वणीच असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आणि देशाचा कारभार सध्या संतप्त लोक चालवत असल्याचे ते म्हणाले. सध्या प्रेम आणि बंधुत्व यांना तिलांजली देण्यात आली आहे. एकीकडे घरांची रंगरंगोटी केली जात आहे, रस्ते स्वच्छ केले जात आहेत आणि दुसरीकडे विष पसरविले जात आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
पं. नेहरू यांचे विचार पुसून टाकण्याचा सध्या जोरदार प्रयत्न केला जात आहे. ज्या शक्ती हे कृत्य करीत आहेत त्या नेहरूंच्या विचारसरणीलाही लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे एकत्रितपणे या शक्तींचा मुकाबला करा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.

काँग्रेसच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात जातीयतेचे विष पसरवत असल्याच्या काँग्रेसने केलेल्या आरोपांवर भाजपने हल्ला चढविला आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे निमित्त साधून काँग्रेस समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भाजपने म्हटले आहे.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वच्छ भारतबाबत केलेल्या विधानावरही भाजपने टीका केली आहे. म. गांधीजींच्या स्वच्छ भारत स्वप्नाची पूर्तता करण्याचा मोदी प्रयत्न करीत आहेत, असे भाजपने म्हटले आहे.
पं. नेहरू यांच्या जयंतीचे निमित्त साधून काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच द्वेषाचे राजकारण करीत आहे, भाजप नव्हे, असेही भाजपने म्हटले आहे.