भारतात करोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. रूग्णालयात बेडव्यतिरिक्त ऑक्सिजनचीसुद्धा तीव्र कमतरता आहे. कोविड १९च्या दुसर्‍या लाटेदरम्यान भारताला अनेक देशांनी मदतीचा हात दिला आहे. मोठ्या प्रमाणात मदत भारतात दाखल झाली आहे. यावरुन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने योग्यप्रकारे काम न केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

“परदेशातून मिळणाऱ्या मदतीवरून सतत स्वतःची छाती बडवणे हे निराशाजनक आहे. जर मोदी सरकारने आपले काम केले असते तर ही परिस्थिती आली नसती” असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

आणखी वाचा- Corona: ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला आणि काळाने डाव साधला; ७ रुग्णांचा तडफडून मृत्यू

करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात लॉकडाउन लावण्याची मागणी याआधी राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच काँग्रेसने गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशातून आलेल्या विविध मदतीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.

देशात दररोज करोनाचे वाढणारे रुग्ण हे सरकारच्या चिंतेत भर घालत आहेत. देशभरात दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. देशातील मृत्यूचा वेग अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहे. त्यामुळे एकूण करोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. देशात रविवारी दिवसभरात तीन लाख ६६ हजार १६१ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५३ हजार ८१८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.