राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या भेटीला, डाव्यांच्याही हालचाली
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपावरून झालेल्या अटकेनंतर विद्यापीठातील वसतिगृहात सुरू असलेल्या शोधमोहीमेवरून राजकीय वातावरण शनिवारीही तापले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यापीठ आवारात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. निरपराध विद्यार्थ्यांवर आकसाने कारवाई करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली असतानाच डाव्या पक्षांच्या शिष्टमंडळाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. कन्हैया कुमार याच्या भाषणाचा जो पुरावा दिला जात आहे त्याची सत्यता शोधण्यासाठी न्यायिक चौकशीचे आदेश केजरीवाल यांनी द्यावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
केजरीवाल यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा आणि संयुक्त जनता दलाचे खासदार के. सी. त्यागी हे होते. जेएनयूमधील घडामोडी म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून आणीबाणीच्याच दिवसांची आठवण यामुळे झाल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेऊन विद्यार्थ्यांवर आकसाने कारवाई न करण्याची मागणी केली होती.
राहुल गांधी यांनी विद्यापीठात विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि केंद्र सरकारच्या विद्यार्थी विरोधी धोरणावर सडकून टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपणारेच देशद्रोही आहेत, अशी टीका त्यांनी केली.
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखताना निरपराध लोकांना त्रास दिला जाणार नाही याची लोकांनी खात्री बाळगावी.