काँग्रेसजनांमधील मोठय़ा घटकाला राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळावी असे वाटते असे मत ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले. पक्षातील प्रमुख नेते राहुल हेच आहेत असे नमूद करत, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे असे खुर्शीद यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

शशी थरुर, संदीप दीक्षित अशा नेत्यांनी नेतृत्वाचा वाद पक्षाने सोडवावा अशी मागणी केली आहे. खुर्शीद यांनी मात्र काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच नसल्याचे नमूद केले. राहुल हे पक्षाचे नेतृत्व करण्यास सर्वार्थाने पात्र आहेत काय? असे विचारता त्याबाबत कोणताही संदेह नाही. मात्र आपण राहुल यांचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांना निर्णयाची संधी दिली पाहिजे. आपली मते त्यांच्यावर लादता कामा नये असे खुर्शीद यांनी नमूद केले. घराणेशाहीचा आरोप भाजप करतो मात्र कोणत्या पक्षात घराणेशाही नाही हे दाखवून द्या, असा प्रतिसवाल खुर्शीद यांनी केला.