कामगार वर्ग, गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी बंगळुरूत इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आल्या आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते कॅन्टीनचं उद्घाटन करण्यात आलं. या कॅन्टीनमध्ये फक्त पाच रुपयांत नाश्ता आणि १० रुपयांत जेवण मिळणार आहे. बंगळुरूत इंदिरा कॅन्टीन सुरू होत आहे. याचा मला अत्यंत आनंद होत आहे. या कॅन्टीनमध्ये कामगार वर्ग आणि गरिबांना स्वस्तात जेवण मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया सिद्धरमय्या यांनी या योजनेच्या घोषणेवेळी दिली होती.

पहिल्या टप्प्यात १०१ कॅन्टीन सुरू होणार आहेत. यामध्ये दर दिवशी ५ रुपयांत शाकाहारी नाश्ता आणि दहा रुपयांत दुपारचं जेवण आणि याच दरात रात्रीचं जेवणही दिलं जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी या कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील इतर शहरे आणि महत्त्वाच्या ठिकाणीही आणखी कॅन्टीन सुरू करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली होती. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्याकडेच अर्थ खातं आहे. त्यांनी चालू आर्थिक वर्षात (२०१७-१८) सर्व १९८ वार्डांमध्ये शेजारी राज्य असलेल्या तामिळनाडूतील ‘अम्मा’ कॅन्टीनच्या धर्तीवर कॅन्टीन सुरू करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. राज्याला ‘भूक मुक्त’ करायचं आहे. राज्यात दर महिन्याला बीपीएल धारकांना ‘अन्न भाग्य योजनें’तर्गत सात किलो तांदूळ मोफत देण्यात येतात. त्याला दोन वेळचं जेवण मिळावं, हा या योजनेमागील हेतू आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.

स्तनपान करणाऱ्या माता आणि गरोदर महिलांसाठी मातृपूर्ण योजनेंतर्गत रोज माध्यान्हं भोजन दिलं जातं. २ ऑक्टोबरपर्यंत ही योजना राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. केंद्रांची संख्या सुमारे १२ लाख आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.