काँग्रेस पक्ष पूर्णपणे संघटित असून राहुल गांधी यांच्या मागे ठामपणे उभा आहे. देशात सध्या ज्या प्रकारचे वातावरण पहायला मिळत आहे त्यानुसार, आगामी २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे.


पंजाब सरकारचे मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना सिंग म्हणाले, त्यांचे पाकिस्तानात जाणे ही लाजीरवाणी बाब नाही. आपल्या या दौऱ्याचे काय परिणाम होतील याची त्यांना कल्पना नव्हती. सिद्धू हे इम्रान खान यांचे मित्र असल्याने त्यांनी इम्रान यांच्या पतंप्रधानपदाच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात जाऊ शकतात. दरम्यान, पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत ते बसल्याने मी त्यांच्यावर कुठलीही टीका करणार नाही. कारण, ते लोक कोण आहेत हे त्यांना माहिती नव्हते, मीही त्यांना ओळखत नाही.


मात्र, पाक लष्करप्रमुखांची त्यांनी गळाभेट घेतली यावर आपला आक्षेप आहे. कारण, आपले ३०० पेक्षा अधिक सैनिक पाकिस्तानच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. तसेच दररोज अनेक जण जखमी होत आहेत. पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या लष्कर प्रमुखांकडून हे आदेश येतात. त्यामुळे पाकिस्तानी प्रशासनातील इतर अधिकारी त्याला जबाबदार नाहीत.


पंजाबमधील शीख दंगलीबाबत बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले, पंजाब या काळात खूपच बिकट परिस्थितीतून जात होता. इथल्या जातीय दंग्यामध्ये ३५,००० लोक मारले गेले आहेत. त्यामुळे जो कोणी धर्माचा आधार घेऊन राज्यातील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा विचार करीत असेल त्यांनी संगीत ऐकावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.