गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपाचे अमित शाह यांनी समाचार घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी आजाराशी संघर्ष करत असलेल्या एका व्यक्तीच्या नावावर खोटे बोलून आपली असंवेदनशीलतेचा परिचय घडवून दिल्याची टीका त्यांनी राहुल गांधींवर केली आहे.

राहुल गांधी यांनी पर्रिकर यांना पत्र लिहिल्याच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी हे ट्विट केले आहे. प्रिय राहुल गांधी, तुम्ही किती असंवेदनशील आहात, हे तुम्ही दाखवून दिले आहे. आजाराशी संघर्ष करत असलेल्या एका व्यक्तीच्या नावावर तुम्ही खोटे बोललात. तुमच्या वर्तणुकीमुळे भारतातील लोक संतप्त झाले आहेत, असे ट्विट केले आहे.

दरम्यान, राहुल यांनी पर्रिकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मी तुमची भेट घेतली ती पूर्णपणे व्यक्तीगत आणि तुमच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती. तुम्ही अमेरिकेत उपचार घेत असताना तुमच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीही मी फोनही केला होता. आपल्या कालच्या भेटीनंतर तुमच्यावर खूप दबाव आहे हे मी समजू शकतो. या दबावामुळेच तुम्हाला पंतप्रधान मोदींप्रती निष्ठा दाखवावी लागत आहे. त्यांचे सहकारी माझ्यावर टीका करत आहेत असे राहुल यांनी पत्रात म्हटले होते.

तत्पूर्वी, पर्रिकर यांनीही राहुल यांना पत्र लिहून आपली नाराजी दर्शवली होती. तुम्ही मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता माझी भेट घेण्यासाठी आलात. माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. भारतीय राजकारणामध्ये पक्षातील भेद बाजूला ठेवत प्रतिस्पर्ध्यांना चांगले आरोग्य चिंतण्याची परंपरा आहे. तुमच्या या कृतीचे मी स्वागत करतो. पण प्रसारमाध्यमांमध्ये आलेली तुमची वक्तव्ये बघून मला धक्काच बसला. या वृत्तांनुसार तुम्ही माझा दाखला देत काही विधाने केलीत. मला राफेल कराराविषयी माहिती नव्हती, असे पर्रिकरांनी सांगितल्याचे तुम्ही म्हणालात. पण आपली भेट फक्त पाच मिनिटे झाली, या भेटीत आपल्यात राफेल करारावर चर्चा देखील झाली नाही, असे पर्रिकरांनी त्यात म्हटले होते.