संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दुसऱ्या सत्रात गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. मात्र, याचे खापर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर फोडत आहेत. त्यासाठी या दोघांनी उपोषणाचे युद्ध छेडले आहे. मोदी सरकारचा नाकर्तेपणा आणि संसद ठप्प राहिल्याबद्दल निषेध म्हणून काँग्रेसच्यावतीने सोमवारी देशभरात निदर्शने करणार आहेत. दरम्यान, महात्मा गांधीचे स्मृतीस्थळ राजघाट येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे कार्यकर्तेही एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. त्याचबरोबर सर्व राज्ये आणि जिल्ह्या मुख्यालयांसमोर निदर्शने करणार आहेत. विशेष म्हणजे संसदेचे कामकाज न चालल्याला विरोधक जबाबदार असल्याचे सांगत भाजपाही आपल्या खासदारांद्वारे १२ एप्रिल रोजी उपोषणाची घोषणा केली आहे.

राहुल गांधी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन आणि काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर निदर्शने करणार आहेत. काँग्रेसने आरोप केला आहे की, मोदी सरकारने संसदेचे कामकाज चालू दिले नाही. त्यामुळे सीबीएसई पेपर लीक, पीएनबी घोटाळा, कावेरी नदीच्या पाण्याचा मुद्दा आणि आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जा यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकली नाही. दरम्यान, आंदोलनादरम्यान, काँग्रेस एससी, एसटी अॅक्ट कथित सौम्य केल्याचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तरुणांच्या रोजगाराचा मुद्द्यांवर आवाज उठवणार आहेत.

तर दुसरीकडे, संसदेतील गोंधळाचे खापर विरोधकांवर फोडताना सत्ताधारी भाजपाने देखील एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजापा अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी याची घोषणा केली होती. शहा म्हणाले होते की, विरोधकांनी संपूर्ण सत्र चालू दिले नाही आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. त्यामुळे याविरोधात १२ एप्रिल रोजी सर्व भाजपा खासदार आपापल्या लोकसभा मतदारसंघात धरणे आंदोलन करणार आहेत. तसेच एक दिवसाचे उपोषणही करणार आहेत.

भाजपाने काँग्रेस आणि बसपासहित विरोधी पक्षांवर दलित समाजाशी संबंधीत मुद्द्यांवरुन वातावरण बिघडवण्याचा कट आखून हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप केला आहे. रविवारी भाजपाने दावा केला की, भाजपा एकमेव दलित समर्थक पक्ष आहे. दलितांच्या मुद्द्यावरून विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपाने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि थावरचंद गहलोत यांना मैदानात उतरवले आहे. त्यांनी राहुल गांधींवर खोटं आणि अफवेद्वारे आगीत तेल ओतल्याचा आरोप केला आहे.