गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे वेगवेगळे ज्येष्ठ नेते विविध निमित्ताने सातत्याने गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. तर काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसते आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः गुजरातमध्ये जाऊन सभा घेतल्या. त्यापैकी एका सभेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलाविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या याच टीकेला कृतीतून उत्तर देण्याचे भाजपने ठरवले आहे. त्यासाठीच भाजपने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना गुजरातमध्ये प्रचाराच्या निमित्ताने पाठविण्याचे निश्चित केले आहे.

येत्या शनिवारी अहमदाबादमध्ये भाजपने महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील महिला सहभागी होतील. महिलांनी या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांना थेट सुषमा स्वराज उत्तर देणार आहेत. ‘महिला टाऊनहॉल’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यानंतर भाजपने सुषमा स्वराज यांना या कार्यक्रमासाठी पाठवण्याचे निश्चित केले. सुषमा स्वराज या स्वतः संघाशी संबंधित आहेत. आपण संघाच्या स्वयंसेविका आहोत, याबद्दल त्या सातत्याने भूमिका मांडत असतात. त्यामुळेच राजकीय दृष्टीने भाजपने त्यांनाच या कार्यक्रमासाठी पाठविण्याचे निश्चित केले. गुजरातमधील महिलांची मते आपल्याच पारड्यात पडावी, यासाठी भाजपने ही चाल खेळली असल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि योजना राबविल्या होत्या. ज्यामध्ये मुलींसाठी मोफत प्राथमिक शिक्षण, लोहाच्या मोफत गोळ्या यांचा समावेश होता. आता महिलांची मते पुन्हा एकदा भाजपकडेच वळविण्यासाठी पक्षाने सुषमा स्वराज यांना कार्यक्रमासाठी तिथे पाठविण्याचा निर्णय घेतला. यामुळे राहुल गांधी यांच्या टीकेलाही आपोआप उत्तर दिले जाईल. काही दिवसांपूर्वीच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा ‘अधिकम गुजरात’ कार्यक्रमामध्ये हजारो भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.

भाजप कायमच महिलांच्या सक्षमीकरणाला महत्त्व देतो. सुषमा स्वराज हे त्याचे उदाहरण आहेच. त्याचबरोबर त्या देशातील लाखो महिलांचे प्रेरणास्थानही आहेत, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.