राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खडसावले. एकतर या प्रकरणी माफी मागा नाहीतर बदनामीच्या खटल्याला सामोरे जा, या शब्दांत न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावले. या पार्श्वभूमीवर बुधवारी संसदेत आलेल्या राहुल गांधी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न वृत्तवाहिन्यांनी केली. पण राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामनना टाळत थेट संसद भवनात प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेदरम्यान, राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. संघाकडून सादर करण्यात आलेल्या साक्षी-पुराव्यांच्या तपासणीनंतर भिवंडी न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश दिले होते. राहुल गांधी यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांना याप्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गाधींना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली होती. तरीही राहुल यांनी मागे न्यायालयाच्या सुनावणीवेळी उपस्थिती लावली होती.
याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राहुल गांधींना खडेबोल सुनावले. बदनामीकारक वक्तव्य करून एखाद्या संघटनेची तुम्ही सरसकट निर्भत्सना करू शकत नाही. त्याचबरोबर एखाद्या संघटनेतील सर्वांनाच एकाच तराजूत तोलताही येत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.