काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘चौकीदार चोर है’ प्रकरण भोवण्याची चिन्हे आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दिलेल्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेप्रकरणी रांचीतील एका न्यायालयाने 3 जुलै रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात 20 कोटी रूपयांचा मानहानीचा दावा करण्यात आला आहे. रांचीचे न्यायदंडाधिकारी कुमार विपुल यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. सुनावणीनंतर न्यायालयाने राहुल गांधी यांच्याविरोधात समन्स जारी केले असून 3 जुलै रोजी न्यायालयात हजार होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वकीलांच्या माध्यमातून आपली बाजू माडंण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

स्थानिक वकील प्रदीप मोदी यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच राहुल यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाज दु:खी झाला आहे, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच यापूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून न्यायालयात शपथपत्रही दाखल केले होते. 3 मार्च 2019 रोजी मोरहाबादीतील अलगुलान येथे झालेल्या रॅलीदरम्यान राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिल्या होत्या. तसेच त्यांनी नीरव मोदी, ललित मोदी यांची नावे घेऊनही आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनीदेखील राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याविरोधात पटनातील नागरी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

13 एप्रिल रोजी कर्नाटकातील एका सभेदरम्यानही त्यांनी अशाचप्रकराच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी त्यांच्यावर 20 कोटी रूपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता.