कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हरियाणातील हसनपूर गावामध्ये खरेदी केलेली सहा एकर जमीन दोन वर्षांपूर्वीच आपली बहिण प्रियंका गांधी यांना भेट म्हणून दिल्याचे स्पष्ट झाले. माहिती अधिकार कायद्यातून ही माहिती मिळाली आहे. प्रियंकाचे पती रॉबर्ट वद्रा यांनी हसनपूर गावामध्येच ३ मार्च २००८ रोजी नऊ एकर शेतजमीन विकत घेतली होती. त्याच दिवशी राहुल गांधी यांनीही त्यांच्या जमीनजवळच सहा एकर जमीन विकत घेतली.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार २६ जुलै २०१२ रोजी राहुल गांधी यांनी हसनपूरमधील जमीन प्रियंका गांधी यांना भेट म्हणून दिली. याच काळामध्ये रॉबर्ट वद्रा यांनी हरियाणामध्ये खरेदी केलेल्या शेतजमिनीवरून वाद निर्माण झाला होता. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज डीएलएफ कंपनीसोबत वद्रा यांनी संबंधित जमिनीसंदर्भात केलेल्या व्यवहारावरून वाद सुरू झाला होता. त्याचवेळी राहुल गांधी यांनी आपली जमीन प्रियंका गांधी यांना भेट दिली.
हसनपूरमधील जमीन खरेदी करताना रॉबर्ट वद्रा आणि राहुल गांधी यांनी दोन वेगवेगळी खरेदीखत केली होती. महेशसिंग नागर यांनी या दोघांतर्फे कुलमुखत्यार म्हणून खरेदीखतावर स्वाक्षरी केली होती.
१२ ऑगस्ट २०१२ रोजी राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हसनपूरमधील जमीन प्रियंका गांधी यांना कोणताही आर्थिक मोबदला न घेता दिली असल्याचे म्हटले आहे.