‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा नारा केंद्र सरकारने दिला. मात्र ती मुलगी जेव्हा तिचे हक्क मागते आहे तेव्हा तिला मारहाण होते आहे. हेच भाजपचे धोरण आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. बनारस हिंदू विद्यापीठात जे सुरू आहे ते सगळे निषेधार्ह आहे. विद्यार्थिनींची काहीही चूक नाही, सरकार या प्रकरणात अपयशी ठरले आहे असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

बनारस हिंदू विद्यापीठ अर्थात बीएचयूमध्ये विद्यार्थिनींची छेडछाड करण्यात आली. त्यानंतर आंदोलन करण्यात आले. रविवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलक विद्यार्थिनींना पांगवण्यासाठी पोलिसांनी रविवारी लाठीमार केला. ज्यामध्ये एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आंदोलन पांगवण्यासाठी बळाचा वापर केल्याने बीएचयूचे विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी जाळपोळ आणि दगडफेक केली. ज्यानंतर बीएचयू  २ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याच ‘बीएचयू’ प्रकरणावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

बनारस हिंदू विद्यापीठ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातील विद्यापीठ आहे. २१ सप्टेंबच्या रोजी या विद्यापीठात शिकणाऱ्या एका मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली. ज्यानंतर हे आंदोलन सुरू करण्यात आले. मुलींच्या वसतीगृहाबाहेर उभे राहून मुले खिडक्यांच्या काचांवर दगड फेकतात, दगडांना बांधून चिठ्ठ्या पाठवतात असा आरोप या विद्यार्थिनीने केला. या सगळ्या छेडछाडीविरोधात विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केले आहे.

बनारस हिंदू विद्यापीठात पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून या संबंधीची माहिती मागवली आहे असेही ‘एएनआय’ने म्हटले आहे. दरम्यान या सगळ्या आंदोलनाला आणि मुलींच्या असुरक्षेला राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.