राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘राहुल गांधीं’सारखेच वागले असे म्हणत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही जेव्हा ‘बटाट्यापासून सोने’ तयार करण्यावर भाष्य करतात. ‘कोका कोलाचा मालक पूर्वी शिकंजी (सरबत) विकायचा’ हे बोललात, ‘बटाट्याची फॅक्ट्री असते’ असे म्हटलात; त्या वक्तव्यांबाबत आम्ही तुम्हाला माफ केले आहे. मात्र तुम्ही बुधवारी जे भाषण जर्मनीतील हॅमबर्ग येथे केले ते मुद्दे गंभीर आहेत. त्यावर तुम्ही उत्तर दिले पाहिजे आणि देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी पात्रा यांनी केली. तसेच राहुल गांधी यांचे भाषण खोटे आणि दिशाभूल करणारे होते अशीही टीका त्यांनी केली.

बुधवारी ज्या मंचावर तुम्ही बोलत होतात त्या ठिकाणी २३ देशांचे प्रतिनिधी हजर होते. तिथे तुम्ही दहशतवादाचे समर्थन केले, ISIS बाबत जे स्पष्टीकरण दिले ते भयावह आणि चिंताजनक आहे. भारतात जी राजकीय स्थिती आहे त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे असे वक्तव्य तुम्ही केले. इराकमध्ये जी परिस्थिती अमेरिकेने निर्माण केली त्यामुळेच ISIS चा उदय झाला. तशाच प्रकारे इथे म्हणजेच भारतातील बेरोजगारी वाढली, अल्पसंख्यांकाना, मागास वर्गाला रोजगार मिळाला नाही मोदी ते देऊ शकले नाहीत तर दुसरे कोणीतरी उभे राहिल (ISIS सारखेच) असे उदाहरण दिले. हे उदाहरण अत्यंत चुकीचे आणि आपल्या देशाचा अपमान करणारे आहे. तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार आहात? आणि तुम्ही काय बोलत आहात याचे तुम्हाला भान नाही? असेही प्रश्न पात्रा यांनी उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी यांनी जर्मनी मध्ये केलेल्या भाषणात आपल्या देशाचा अपमान केला. त्यासाठी राहुल गांधी यांना जनता माफ करणार नाही. गेल्या ७० वर्षात भारतात गांधी परिवाराचीच सत्ता होती. या परिवाराने देशाला कोणती दिशा दिली हे तुम्हाला सांगता येईल का? असा प्रश्न विचारत राहुल गांधींची वक्तव्ये संबित पात्रा यांनी खोडून काढली आहेत. तसेच राहुल गांधी यांनी आपल्या जर्मनीतल्या भाषणाबाबत देशाची माफी मागितली पाहिजे अशीही मागणी पात्रा यांनी केली. तुम्ही जे जर्मनीत बोललात ते खोटे आणि दिशाभूल करणारे होते अशीही टीका पात्रा यांनी केली.