काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याना मोदी फोबिया जडला आहे. त्याचमुळे ते सातत्याने मोदी, मोदी हा जप त्यांच्या भाषणांमधून करत आहेत. राहुल गांधींचे लक्ष्य मोदी हटवणे आहे, मात्र आमचे लक्ष्य देशातून गरीबी, बेरोजगारी आणि निरक्षरता घालवणे आहे असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. मध्यप्रदेशातील नरसिंहपूरमध्ये त्यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. राहुल गांधींना मोदी फोबिया हा आजार झाला आहे. त्यांना मोदींची भीती वाटू लागली आहे असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

आपल्याला ठाऊकच आहे की गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबांनींचा फायदा करून देण्यासाठी फेरफार केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी आत्तापर्यंत अनेकदा केला आहे. एवढंच नाही तर बेरोजगारी, गरीबी यावरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. देशका चौकीदार चोर है हा हॅशटॅगही त्यांनी ट्विटरवर ट्रेंड केला. इतर काँग्रेस नेत्यांनीही आरोप करताना हा हॅशटॅग वापरल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र अमित शाह यांनी या सगळ्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

राफेल करार, मोदींनी दिलेली आश्वासने, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या सगळ्या प्रश्नांवरून राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. आता पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यानही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींना मोदी फोबिया जडला आहे असा आरोप केला आहे. या आरोपांना आता राहुल गांधी काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.