rahulगेल्या एक महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी नेमके आहेत कुठे, याचा शोध घेण्यासाठी अमेठीतील जनता पुढे सरसावली आहे. राहुल गांधी कुठे आहेत, याची माहिती कळवा आणि बक्षिस मिळवा, असे पोस्टर सध्या अमेठीमध्ये लावण्यात आले आहेत. राहुल गांधी हरविल्याच्या या नव्या पोस्टरमुळे राहुल गांधी आणि कॉंग्रेसपुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधीपासून राहुल गांधी सुटीवर गेले आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे रितसर अर्ज करून त्यांनी सुटी मंजूर करून घेतली आहे. मात्र, संसदेच्या अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतरही राहुल गांधी सुटीवरून न परतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच राहुल गांधी सुटी घेऊन नेमके कुठे गेले आहेत, याचीही माहिती कॉंग्रेसकडून देण्यात येत नसल्यामुळे विविध प्रश्न उपस्थि करण्यात येत आहेत.
संसद अधिवेशनाच्या काळातच राहुल गांधी सुटीवर गेल्यामुळे अमेठीतील नागरिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे, त्याची यादीही काही पोस्टरवर छापण्यात आली आहे. या पोस्टरवर जाने वो कौनसा देश, जहॉं तुम चले गए, ना चिठ्ठी ना संदेश, कहॉं तुम चले गए, अशाही ओळी छापण्यात आल्या आहेत.
बुलंदशहर आणि अलाहाबादमध्ये राहुल गांधी कुठे आहेत कळवा आणि बक्षिस मिळवा, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरसंदर्भात माहिती मिळाल्यावर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर ते हटविण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागण्याची वेळ आली आहे.