‘राहुल गांधींचा विजय असो, राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करा’ अशा घोषणा नवी दिल्लीतील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. अध्यक्षा सोनिया गांधी भाषणासाठी व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांच्या घोषणा आणखी जोर धरू लागल्या. मात्र, सोनिया गांधींनी भाषणाच्या सुरूवातीलाच राहुल गांधींबद्दलचा जो काही निर्णय घ्यायचा होता तो कालच झाला आहे आणि तो अंतिम आहे. असे म्हणत राहुल गांधी फक्त प्रचारप्रमुखच राहतील अशी स्पष्टोक्ती दीली.
तरीसुद्धा राहुल गांधींबद्दलच्या घोषणा काही थांबल्या नाहीत. सोनिया गांधींनी विविध विषयांवरून कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकांसाठी मार्गदर्शन केले. तसेच विरोधकांवर चौफेर टीकाही केली.
जातीय तेढ निर्माण करणाऱया पक्षांच्या विरोधात लढत राहू- सोनिया गांधी
सोनिया गांधींच्या भाषणानंतर जर्नादन द्विवेदींनी पुढील नियोजित कार्यक्रमाची सुत्रे हाती घेतल्यावरही कार्यकर्त्यांच्या घोषणा काही थांबत नव्हत्या, यावर द्विवेदींनीही “जेव्हा पंतप्रधान पदाचा प्रश्न पक्षात निर्माण होईल तेव्हा तुमच्या मनात जे काही आहे. त्यांच्याशिवाय (राहुल गांधी) पक्षात दुसरा कोणी उमेदवार आहे का?’ असे म्हणत कार्यकर्त्यांना शांतता राखण्याची विनंती केली. तरीसुद्धा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच राहील्याने खुद्द राहुल गांधींनी हस्तक्षेप करत, “शांत व्हा! दुपारी माझेही भाषण होणार आहे, सध्याचा नियोजित कार्यक्रम सुरू राहण्यासाठी सहकार्य करा. तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याबद्दल माझ्याही मनात काही भूमिका आहेत. त्या मी माझ्या भाषणात तुमच्या समोर मांडेन” असे सांगत दुपारी सर्व विषयांवर सविस्तर बोलणार असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधीेचे भाषण होणार आहे. त्यामुळे अधिवेशनात सुरू असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावाचा विचार काँग्रेस करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.