गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे सुडाचे राजकारण करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांनी शनिवारी केला. राज्याच्या प्रगतीसाठी महात्मा गांधी यांनी सुचविलेल्या प्रेमाच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शनिवारी संपला. शेवटच्या दिवशी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
गुजरातमध्ये सामान्य नागरिकांच्या नाही, तर केवळ एकाच व्यक्तीच्या स्वप्नांचा विचार केला जातो, अशी टीका त्यांनी नरेंद्र मोदींचे नाव न घेता केली. येथील मुख्य समस्या म्हणजे एक व्यक्ती संपूर्ण गुजरातचा कारभार चालविण्याचा व राज्याची प्रगती केल्याचा दावा करतो व त्याचे मन सुडाने पेटलेले आहे. मात्र  द्वेषपूर्ण मानसिकता उराशी बाळगून विकास कधीही होत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. राज्याची प्रगती ही नागरिकांच्या प्रेमामुळेच शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.आपल्या चारपैकी दोन प्रिय व्यक्तींची दहशतवाद्यांनी हत्या केली. माझ्या आजी आणि वडिलांच्या हत्येनंतर मी कमालीचा संतापलेला होतो. रागाने आंधळ्या झालेल्या व्यक्तीसारखी आपली अवस्था झाली होती. मात्र हा राग बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला समोरचे स्वच्छ चित्र दिसले. आता माझ्या हृदयातून राग हद्दपार झाला आहे, असा दावा राहुल यांनी या सभेत केला .