आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी हेच काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचे त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या महत्त्वाच्या जबाबदारीतून ध्वनित होत आहेत.
राहुल गांधी यांची पक्ष संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून पदोन्नती होणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती. त्याची सुरुवात गुरुवारच्या नियुक्तीमुळे झाली आहे. या नव्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाची आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राहुल गांधी यांना समितीचे अध्यक्षपद देताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या दिमतीला देण्यात आले आहे. फरीदाबाद येथे नुकत्याच झालेल्या संवाद बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जाहीर केल्यानुसार लोकसभा निवडणुकांसाठी समन्वय समिती तसेच दोन उपगटांची स्थापना केली. या नव्या समित्यांवर सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या समितीत अहमद पटेल, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह, जनार्दन द्विवेदी, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश तसेच मधुसूदन मिस्त्री यांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय सोनिया गांधी यांनी तीन उपगट स्थापन केले आहेत. संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूकपूर्व युतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उपगटात पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली, पक्षाचे सरचिटणीस मुकूल वासनिक, मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पचौरी, क्रीडा मंत्री जितेंद्र सिंह आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मोहन प्रकाश यांचा समावेश करण्यात आला आहे.
ए. के. अँटनी यांच्याच अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जाहीरनामा आणि सरकारच्या कार्यक्रमविषयक उपगटात अर्थमंत्री पी. चिदंबरम, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वाणिज्य मंत्री आनंद शर्मा, परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संदीप दीक्षित, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, काँग्रेसच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी, पी. एल. पुनिया आणि विशेष निमंत्रित मोहन गोपाल यांचा समावेश आहे.  
दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क आणि प्रसिद्धीचा उपगट स्थापन करण्यात आला आहे. या उपगटात सरकारमधून पक्षसंघटनेत परतलेल्या अंबिका सोनी, माहिती व नभोवाणी मंत्री मनीष तिवारी, ऊर्जा मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला, खासदार दीपिंदर हुड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री भक्तचरण दास यांचा समावेश आहे.