येत्या लोकसभा निवडणुकीपासून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेच पक्षाचे नेतृत्त्व करणार असल्याचे केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी मंगळवारी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी देणार का, या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.
ते म्हणाले, राहुल गांधी हे २०१४मधील लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्त्व करणार आहेत. एकदा आम्ही ही निवडणूक जिंकलो आणि यूपीए-३ची स्थापना झाल्यानंतर आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हे तुम्ही बघालच. आपला देश मोठा असून, विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळे धर्म, संस्कृती, पंरपरा यांचा आपल्याकडे समुच्चय आहे. अशावेळी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्त्व देशाला हवे आहे. माझ्या मनात तरी असे नेतृत्त्व करणारे एकच नाव आहे. ते म्हणजे राहुल गांधी.
२००९च्या निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यासंदर्भात विचारले असता, जाहीरनामा प्रसिद्ध होण्याच्या दिवसापर्यंत थांबा. त्यावेळी पक्ष काही घोषणा करेल. मात्र, आत्ता काहीच सांगता येणार नाही.