दोषी लोकप्रतिनिधींचे रक्षण करणाऱ्या अध्यादेशावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टीका हे केवळ नाटक आहे. या अध्यादेशाप्रकरणी झालेल्या टीकेमुळे केवळ आपली अधिक बदनामी होऊ नये म्हणून राहुल गांधी यांनी केलेली टीका म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी तोफ डागून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आता जरा तरी स्वाभिमान असेल तर त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने शुक्रवारी केली.
राहुल गांधींनी केली कॉंग्रेसची गोची; डागाळलेल्या लोकप्रतिनिधींना संरक्षण देणारा वटहुकूम अर्थहिन
आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेली टीका हे संधीसाधूपणाचेच प्रतीक असून काँग्रेसने लोकशाहीची थट्टाच आरंभिली आहे, असा आरोप भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी केला. राहुलना अशा प्रकारचे नाटक नवीन नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या वेळीही त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवारांची यादी फाडून टाकली होती, तसेच वर्तन आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते आता करीत आहेत, असे लेखी म्हणाल्या. राष्ट्रपती मुखर्जी या अध्यादेशास मान्यता देण्याच्या मन:स्थितीत नसून त्यांच्याकडून हा अध्यादेश परत पाठविला जाण्याची शक्यता असल्याने राहुल गांधी यांना हा अध्यादेश ठोकरल्याचे श्रेय घ्यायचे असावे, असाही टोमणा लेखी यांनी मारला. सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय राहुल गांधी यांना देऊन पंतप्रधानपदी त्यांचे नाव पुढे करण्याची काँग्रेसची ही चाल आहे. सरकार चुकू शकते, मंत्रिमंडळ चुकू शकते. परंतु राजघराणे कधी चुकूच शकत नाही आणि हाच काँग्रेसचा मंत्र आहे, असा चिमटा लेखी यांनी काढला. ‘सर्व चुकीच्या गोष्टींचे खापर मनमोहन सिंग यांच्या माथी मारून सर्व चांगल्या गोष्टींचा वाटा सोनिया गांधी यांच्याकडे देणे’ हीच काँग्रेसची चाल आहे, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस केवळ संधीसाधूपणाचेच राजकारण करीत असल्याचे शुक्रवारच्या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका लेखी यांनी केली.