दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले असले तरी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली नव्हती ती म्हणजे सीबीआयच्या पथकाने मुख्यमंत्र्यांच्या दालनात प्रवेश केला होता का? प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांच्या कार्यालयावर छापा टाकला त्या वेळी सीबीआय पथक मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले होते का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पथकाने प्रवेश केला नाही, असे सीबीआय आणि केंद्र सरकार सांगत असले तरी आप आणि दिल्ली सरकारचे कर्मचारी यांनी सांगितलेली बाब निराळी आहे. सीबीआयच्या पथकात एकूण आठ अधिकारी होते आणि त्यांनी सकाळी ९.३० वाजता सचिवालयात प्रवेश करून छापा टाकला, असे दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिल्ली सरकारचे माध्यम सल्लागार अरुणोदय प्रकाश हे तिसऱ्या माळ्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात प्रथम गेले. प्रकाश हे सचिवालयात पोहोचले तेव्हा त्यांना सीबीआयच्या पथकाने मुख्यमंत्र्यांच्या दालनासह तिसऱ्या माळ्याला वेढा घातल्याचे निदर्शनास आले, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले.
सकाळी १० वाजता आपण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा अनेक रक्षकांना तेथे पाहिले. मुख्यमंत्री दालनात कोणालाही जाण्याची मुभा देण्यात येत नसल्याचे तेथील एका रक्षकाने आपल्याला सांगितले. आपण कोण आहात, असे एका सीबीआय अधिकाऱ्याने आपल्याला विचारले, त्यानंतर आपण ओळख सांगितली, मात्र कोणालाही दालनात जाण्याची अनुमती नाही, असे सीबीआय अधिकाऱ्याने आपल्याला सांगितल्याचे प्रकाश म्हणाले.
त्याचप्रमाणे जे अधिकारी सकाळी लवकर कार्यालयात पोहोचले होते त्यांना कार्यालय न सोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे प्रकाश म्हणाले.
सीबीआय अधिकारी सचिवालयात आल्याची आपल्याला कल्पना होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात येणार आहे याची आपल्याला कल्पना नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आपचा दावा..
’मुख्यमंत्री दालनाला सीबीआय पथकाचा वेढा. दिल्ली सरकारचे माध्यम सल्लागार अरुणोदय प्रकाश यांनाही मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ दिले नाही.
’ जे कर्मचारी सकाळीच कार्यालयात गेले होते त्यांना कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली नाही.