आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी किंवा मालवाहतुकीच्या भाड्यात थेटपणे कोणतीही वाढ न सुचविणारा रेल्वेचा २०१३-१४ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत सादर केला. लोकसभा निवडणुकीची चाहूल अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्यामुळे विरोधकांनी बन्सल यांच्या भाषणावेळी जोरदार घोषणा देऊन गोंधळ घातला.
रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन गेल्या २१ जानेवारीलाच बन्सल यांनी सर्व वर्गांच्या प्रवासी भाड्यात वाढ केली होती. मात्र, त्यानंतर डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात पुन्हा भाववाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, बन्सल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रवासी भाड्यात थेटपणे कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यामध्ये आकारण्यात येणाऱया विविध अधिभारांचे प्रमाण डिझेलच्या दरांप्रमाणे कमी-जास्त करण्यात येईल, अशी घोषणा बन्सल यांनी केली. तात्काळ तिकिट, सुपरफास्ट गाड्या आरक्षण शुल्क, तिकिट रद्द करण्याचे शुल्क यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. वर्षांतून दोन वेळ इंधन अधिभार निश्चित करण्यात येईल, असेही बन्सल यांनी स्पष्ट केले.
विविध मार्गांवर एकूण ६७ नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा बन्सल यांनी केली. त्याचबरोबर २७ नव्या पॅसेंजर्सही सुरू करण्याचे त्यांनी जाहीर केले.
ई-तिकिटांकडे विशेष लक्ष
सध्याच्या काळाची गरज ओळखून ई-तिकीट सुविधेचे अत्याधुनिकीकरण करण्याचेही बन्सल यांनी स्पष्ट केले. सध्या असलेल्या ई-तिकीट यंत्रणेमध्ये प्रतिमिनिट केवळ दोन हजार तिकिटे देता येतात. यामध्ये वाढ करण्यासाठी नवी व्यवस्था अंमलात आणण्यात येईल. त्यामध्ये प्रतिमिनिट ७२०० तिकिटे देण्याची सुविधा असणार आहे. त्याचबरोबर दिवसातील २३ तास इंटरनेट बुकिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. केवळ रात्री साडेअकरा ते साडेबारा या वेळेत इंटरनेट बुकिंगची सुविधा बंद ठेवण्यात येईल. मोबाईलमधूनही ई-तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी ६३ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे;
* भारतीय रेल्वेचा देशाच्या विकासाशी जवळचा संबंध.
* आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे, हे भारतीय रेल्वेपुढे सध्या सर्वांत मोठे आव्हान.
* जादा गाड्यांमुळे रेल्वेच्या तोट्यात वाढ.
* रेल्वेच्या तोट्यामुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देता येत नाहीत.
* अलाहाबादेत झालेल्या दुर्घटनेने रेल्वेला शिकण्याची गरज.
* रेल्वेत महिलांच्या सुरक्षेसाठी महिला राखील पोलिस दलाच्या तुकड्यांची संख्या वाढविणार, सध्या चार तुकड्या कार्यरत.
* रेल्वेच्या सर्व डब्यांमध्ये स्मोक डिटेक्टर यंत्रणा बसविण्यात येणार.
* काही रेल्वेंमध्ये मोफत वाय-फाय सुविधा पुरविली जाणार.
* प्रवाशांसाठी काही रेल्वेगाड्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अंतर्गत रचना असलेला ‘अनुभुती’ हा डबा जोडला जाणार.
* नागपूरमध्ये रेल्वेचा नवा प्रकल्प उभारणार.
* दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील रेल्वेस्थानकाकडे विशेष लक्ष देणार.
* प्रतिमिनिट ७२०० तिकिटे देण्याची क्षमता असलेल्या नव्या ई-तिकीटिंग सुविधेची लवकरच सुरुवात.
* मोबाईलमधून इ-तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार.
* इंटरनेट बुकिंगची दिवसातील २३ तास उपलब्ध करून देणार, रात्री ११.३० ते १२.३० इंटरनेट बुकिंग बंद राहणार.
* तिकिटाच्या आरक्षणासाठी आधार कार्डाचा वापर.
* आरक्षणाची स्थिती कळण्यासाठी एसएमएस अलर्ट योजना अमलात येणार.
* नागपूरसह सहा शहरांमध्ये प्रवाशांना उतरण्यासाठी सर्व सुविधांनी सज्ज आधुनिक लाऊंज