सर्वसामान्य प्रवाशांवरचा बोजा वाढविणारा अर्थसंकल्प, या शब्दांत विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर टीका केली. 
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी … हे तर रायबरेली बजेट असल्याची टीका केली. सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीसाठी अर्थसंकल्पात जास्त तरतूद करण्यात आल्याचा आरोप मुंडे यांनी केला. बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड यांना या अर्थसंकल्पातून पूर्णपणे वगळण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यांनीही रेल्वे अर्थसंकल्प हा तर कॉंग्रेससाठीचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली.
बन्सल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या भविष्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याचे डाव्या पक्षांनी म्हटले आहे. बहुजन समाज पक्षाने हा अर्थसंकल्प गरीबविरोधी असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशाला यातून काहीच मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.