कानपूर रेल्वे अपघातात आयएसआयचा हात असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता देशभरात अनेक ठिकाणी रेल्वे अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अकोल्यातील सिकंदराबाद रेल्वे मार्गावर याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला. या मार्गावरून जात असलेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या मार्गात अज्ञात व्यक्तीने मोठा दगड ठेवल्याची घटना बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली. इंटरसिटी एक्स्प्रेस अकोला- सिकंदराबाद रेल्वे मार्गावरून जात असताना बार्शिटाकळी तालुक्यातील अनकवाडी – लोहगड दरम्यान रुळांच्या मध्ये हा भलामोठा दगड ठेवण्यात आला होता. यावेळी सुदैवाने कोणताही अपघात घडला नसला तरी या दगडाचा आकार बघता इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात होण्याची शक्यता होती. इंटरसिटी एक्स्प्रेसचा वेग जास्त असल्याने हा दगड बाजूला फेकला गेला. मात्र, दगड मोठा असल्याने रूळांमधील सिमेंट खांबाला तडे गेले आहेत. त्यामुळे या मार्गावर दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत उघडकीस आलेल्या रेल्वे घातपाताच्या घटना पाहता अज्ञात व्यक्तीविरोधात बार्शिटाकळी पोलिसांत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेमार्गावर अशाप्रकारच्या सलग दोन घटना घडल्या होत्या. जेएनपीटी परिसरातील जासई येथे बुधवारी रुळांवर विजेचा खांब आडवा टाकलेला आढळला. या मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाला हा खांब दिसल्यामुळे पुढील अपघात टळला. विशेष म्हणजे मुंबई विभागात झालेले घातपाताचे सर्व प्रयत्न आतापर्यंत लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळले आहेत. याबाबत पनवेल पोलिसांमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असून वारंवार घडणाऱ्या या घटनांचा छडा लावण्यासाठी गुन्हे विभागही रेल्वेच्या मदतीला आला आहे. मध्य रेल्वेवर पनवेल-जेएनपीटी यांदरम्यान मालवाहतूक होते. या वाहतुकीला जेएनपीटी बंदरामुळे महत्त्व आहे. त्याशिवाय जासई येथे मध्य रेल्वेची काही गोदामे आहेत. बुधवारी दुपारी ३.५० च्या दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाला रुळांवर एक खांब आडवा पडलेला दिसला. त्याने प्रसंगावधान दाखवून वेळीच गाडी थांबवली आणि संभाव्य अपघात टळला. हा अपघात झाला असता, तर काही काळ जेएनपीटी बंदराशी असलेला रेल्वे संपर्क खंडित झाला असता. अधिक तपास केला असता हा खांब रेल्वेच्याच ओव्हरहेड वायरचा असल्याचे आढळले. हा खांब सुमारे सात मीटर लांब होता. तो तेथे कोणी ठेवला, याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

याआधी २४ जानेवारीला दिवा स्थानकाजवळ सात मीटर लांबीचा रुळाचा तुकडा रुळांवर आडवा टाकलेला आढळला होता. त्यानंतर सोमवारी पनवेल-दिवा यांदरम्यान रुळाचा तुकडा सापडला होता. या दोन्ही घटनांमध्ये पॅसेंजर गाडय़ांचा सहभाग होता आणि या वेळी लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठय़ा दुर्घटना टळल्या होत्या. आता पंधरवडाभरात तिसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, राज्य पोलीस एकत्रितपणे तपास करणार आहेत. या तपासात आता गुन्हे विभागही सहकार्य करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल श्रीवास्तव यांनी सांगितले.