News Flash

चिनाब नदीवर ‘आयफेल टॉवर’पेक्षा उंच पूल बांधणार

१.३१५ किलोमीटरचा हा पूल अभियांत्रिकीतील एक मोठा चमत्कार मानला जाईल.

| May 8, 2017 02:16 am

प्रतिकात्मक छायाचित्र

काश्मीरमध्ये चिनाब नदीवर येत्या दोन वर्षांत आयफेल टॉवर्सपेक्षा उंच रेल्वे पूल बांधला जाणार आहे. काहीसा वक्राकार असलेला हा पूल बांधण्यासाठी ११०० कोटी रुपये खर्च येणार आहे व त्यात २४ हजार टन पोलाद वापरले जाईल, नदीपात्रापासून ३५९ मीटर उंचीवर तो असेल. ताशी २६० किलोमीटर वेगाने गाड्या त्यावरून धावू शकतील.  या पुलासाठी फिनलंड, जर्मनी येथील कंपन्यांनी सल्लागार म्हणून काम करण्याचे मान्य केले आहे.

१.३१५ किलोमीटरचा हा पूल अभियांत्रिकीतील एक मोठा चमत्कार मानला जाईल. हा पूल कटरामधील बक्कल व श्रीनगर येथील कौरी या दोन ठिकाणांना जोडणारा असेल. उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे प्रकल्पातील कटरा व बनीहालच्या १११ किमी पट्टय़ाचा हा पूल एक भाग असणार आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की या पुलाची बांधणी आव्हानात्मक आहे व तो पूर्ण झाल्यावर अभियांत्रिकीतील चमत्कार वाटेल. हा पूल २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यात निरीक्षणासाठी रोप वे असणार आहे.

हा पूल चीनमध्ये बेजपान नदीवर बांधलेल्या २७५ मीटर उंचीच्या शुइबाय पुलाचा विक्रम मोडणार आहे. यात पोलादाचा वापर केला जाणार असून ते उणे २० अंश सेल्सियस तपमान व ताशी २५० कि.मी. वेग सहन करू शकेल.

वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी त्यात संवेदक असतील व वाऱ्याचा वेग ताशी नव्वद किलोमीटर झाल्यास मार्ग तांबडा होऊन रेल्वे वाहतूक थांबवली जाईल. यात ६३ मि.मी. जाडीचे स्फोट प्रतिबंधक पोलाद वापरले जाणार असून दहशतवादी हल्ल्यांचा धोका विचारात घेऊन ही उपाययोजना केली आहे. त्याचे खांबही काँक्रिटचे असतील पण ते स्फोट प्रतिबंधक राहणार आहेत. धोक्याच्या परिस्थितीत प्रवाशांचे रक्षण करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा वापर केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 2:16 am

Web Title: railway bridge taller than the eiffel tower to be built over chenab river
Next Stories
1 काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा साथीदारासाठी हवेत गोळीबार
2 फ्रान्समध्ये अध्यक्ष निवडीसाठी मतदान
3 सतारीचे सूर हरपले उस्ताद रईस खान यांचे निधन
Just Now!
X