रेल्वेतील गुंतवणुकीबाबतची व्यवहार्यता तपासण्यासाठी एका नव्या पथकाची स्थापना करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांचे अनुदान आणि नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संसदेत २०१६-१७ चा रेल्वे अर्थसंकल्प मांडताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, एक समर्पित आणि विविध कामे करणाऱ्या या पथकाला स्पेशल युनिट फॉर ट्रान्स्पोर्टेशन रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिटिक्स (सूत्र) असे संबोधण्यात येणार आहे. ही समिती गुंतवणुकीबाबतच्या निर्णयांची व्यवहार्यता तपासणार आहे.
या पथकामध्ये व्यावसायिक विश्लेषक आणि निर्णयाशी पोषक अशी सर्वोत्तम यंत्रणा असेल. एक संघटना म्हणून भारतीय रेल्वे दर वर्षी १०० हून अधिक टेराबाइट माहिती गोळा करते, मात्र त्याचे विश्लेषण होत नाही, असेही ते म्हणाले. नावीन्यपूर्ण कल्पना आणि विकासाभिमुख व्यवसाय प्रत्यक्षात आणण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेला भेडसावणाऱ्या अत्यंत गंभीर समस्यांवर नावीन्यपूर्ण आव्हान स्वीकारून आम्ही दर वर्षी उपाय शोधणार आहोत. गुंतवणूकदार, भारतीय रेल्वे राष्ट्रीय अकादमीचे प्रतिनिधी, रेल्वे मंडळ आणि रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखालील ‘कायाकल्प’ यांचा कल्पकता समितीमध्ये समावेश असून त्यांच्यामार्फत याची अंमलबजावणी केली जाईल, असेही प्रभू म्हणाले.
टाटा यांच्या अध्यक्षतेखालील कायाकल्प ही रेल्वेची नवी कौन्सिल असून रेल्वेप्रणालीत कोणत्या सुधारणा गरजेच्या आहेत त्याची ही समिती शिफारस करणार आहे. कमी उंचीचे फलाट, डब्यांची वाढती संख्या आणि रेल्वे स्थानकोवर डिजिटल सक्षम यंत्रणा उभारणे ही या वर्षीची आव्हाने आहेत. त्याचबरोबर सर्व कारखान्यांमध्ये आणि उत्पादन विभागांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. स्थानकांवर युवक आणि व्यापारी वर्गासाठी वायफाय सेवा सुरू करण्यात आली असल्याचेही प्रभू म्हणाले.