तब्बल सतरा वर्षांनंतर रेल्वे खाते सांभाळण्याची संधी मिळालेल्या काँग्रेसच्या वतीने थोड्याच वेळात संसदेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मंगळवारचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच बन्सल यांच्या रेल्वे मंत्रालयाने २१ जानेवारी रोजी प्रवासी भाडय़ात वाढ केली असून, त्यानंतर झालेल्या डिझेल दरवाढीमुळे पुन्हा भाडेवाढ होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा रेल्वे अर्थसंकल्प असल्यामुळे काँग्रेस पक्षातून प्रस्तावित भाडेवाढीला विरोधही होत आहे. या स्थितीत रेल्वेमंत्र्यांच्या पेटाऱयातून कोणाला काय मिळणार, हे थोड्याच वेळात कळेल.
काँग्रेसच्या सरकारच्या वतीने केंद्रातील शेवटचा रेल्वे अर्थसंकल्प १९९६ साली तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी सादर केला होता. त्यानंतर सतरा वर्षांनी काँग्रेसच्या मंत्र्याला रेल्वे अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली आहे. अर्थसंकल्पावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या धोरणांची छाप पडलेली असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बन्सल यांच्याकडे रेल्वेमंत्रिपदाची सूत्रे येण्यापूर्वी गेल्या वर्षभरात हे खाते दिनेश त्रिवेदी, मुकुल रॉय आणि सी. पी. जोशी यांनी सांभाळले होते.
मुंबईकरांच्या अपेक्षा
* कल्याण-चर्चगेट लोकल
* डहाणूपर्यंत लोकल
* महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने
* वसई- पनवेल दरम्यान लोकल सेवा सुरू
* मध्य रेल्वेवरील सर्व विद्युतप्रणाली डीसीवरून एसीवर
* परळ येथे उपनगरी गाडय़ांचे नवे टर्मिनस
* ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग
* हार्बर मार्गावर हायस्पीड कॉरीडॉर
* ठाणे-कर्जत आणि ठाणे-कसारा जादा गाडय़ा
* प्रत्येक फलाटावर ‘स्वच्छ’ स्वच्छतागृह
* अंधेरी-विरार, बोरिवली विरार जादा गाडय़ा
* इंडिकेटर्सवर पुढच्या किमान दोन गाडय़ांची माहिती
* वातानुकूलित उपनगरी गाडी
* सर्व उपनगरी गाडय़ा ‘बम्बार्डिअर’च्या
* कल्याण-कसारा दरम्यान किमान तीन नवी स्थानके
* कल्याण-कर्जत दरम्यान किमान एक नवे स्थानक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 7:45 am